सोशल मीडिया विकृतांच्या विळख्यात, सामुहिक बलात्कार कसा करावा सांगणारी पोस्ट व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मिडिया सध्या विकृतांच्या विळख्यात सापडला आहे. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा देशभरातून निषेध होत आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मागणीने जोर धरला आहे. त्यानंतरही सोशल मिडियावरील विकृत प्रवृत्ती अधिकच सक्रीय झाल्या आहेत. महिलेवर बलात्कार किंवा सामुहिक बलात्कार कसा करावा अशी धक्कादायक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याबद्दल महिलावर्गात संताप व्यक्त होत आहे.

ही आक्षेपार्ह पोस्ट बंगालमधून व्हायरल झाली आहे. ती बंगाली भाषेत आहे. कोलकातामधील अनेक जणांनी ती पोस्ट व्हायरलही केली आहे. प्रणाधिका सिन्हा देवबर्मन यांनी या पोस्टबद्दल कोलकाता पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पोलीस सहआयुक्तांनाही ट्विट करत माहिती दिली आहे. ‘लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत असताना बलात्कार कसा करावा हे सांगणारी व्यक्ती सोशल मिडियावर नको, पृपया मदत करा’ असे ट्विटही त्यांनी कोलकाताच्या पोलीस सहआयुक्तांना केली आहे.

ट्रोलर्सची धोनीला धमकी, पराभव झाला तर तुझ्या मुलीवर बलात्कार करू

आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू न शकलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला तर ट्रोलर्सनी सोशल मिडियावर धमकी दिली आहे. चेन्नईचा आयपीएलमध्ये पराभव झाला तर तुझ्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू अशी धमकी एका ट्रोलरने धोनीच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुध्द चेन्नई सुपरकिंग्जचा दहा धावांनी पराभव झाला. त्या सामन्यानंतर धोनीला ही धमकी मिळाली आहे. त्या सामन्यात धोनीला बारा चेंडूंमध्ये फक्त अकरा धावाच करता आल्या होत्या. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अशा विकृत मानसिकतेकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे असे म्हटले आहे तर काँग्रेस खासदार नगमा यांनी यावरून पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.