
>> भगवान परळीकर
ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद राजगुरू यांच्या निधनाने जुन्या काळातील सोलापूर जिह्यातील राजकीय अभ्यासक व व्यासंगी पत्रकार हरपला आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात दै. ‘संचार’मधून झाली. त्यानंतर दै. ‘तरुण भारत’ पुणेचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे काम पहिले. ‘तरुण भारत’च्या सोलापूर आवृत्तीचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते. त्यांची राजकीय वार्तापत्रे अभ्यासपूर्ण असत. सोलापूर जिह्यातील राजकीय घडामोडींची सखोल माहिती त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या वार्तापत्रांची सर्वत्र चर्चा होत असे. जिल्हा परिषद व महापालिकेच्या वार्तासंकलनाचे काम त्यांनी धडाडीने केले व विविध विकास योजनांचा त्यांनी पाठपुरावा केला. राजकीय नेत्यांची तरुण पत्रकारांना ते ओळख करून देऊन वार्तासंकलनासाठी मदत करीत असत. सोलापूरच्या जुन्या पिढीतील आदर्श, व्रतस्थ पत्रकारिता जपणाऱयांपैकी सन्मानानं ज्यांचे नाव घेतले जाते त्यात श्रीपाद राजगुरू यांचा समावेश होता.
जवळपास चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी सोलापूरमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान दिले आहे. सोलापूर जिह्यातील एक राजकीय अभ्यासक, व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची आठवण कायम राहील. मावळत्या पिढीतील काही पत्रकार असेही आहेत, त्यांचे नाव जरी चर्चेत निघाले तरी लोकांमध्ये आदरयुक्त दरारा दिसून येतो. सोलापूरच्या मागच्या पिढीतील काही पत्रकारांची नावे त्यांनी केलेल्या उज्ज्वल, व्रतस्थ पत्रकारितेमुळे कायम लोकांच्या स्मरणात राहतील. यात स्व. कमलाकर पिंपरकर, पत्रमहर्षी बाबुराव जक्कल, व्ही. आर. कुलकर्णी, रंगाअण्णा वैद्य, वसंतराव एकबोटे, पीटीआयचे वार्तांकन करणारे पु. ज. बुवा यांच्या आठवणी आजही निघतात तेव्हा आदराने उल्लेख होतो. व्रतस्थ, अभ्यासू पत्रकारिता त्यांनी जपली. आजच्या पिढीतील अनेक पत्रकारांचे हे सर्वजण आदर्श आहेत. श्रीपाद राजगुरू यांनी गेली दहा वर्षं पत्रकारितेतून आणि सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती. सोलापूर जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो किंवा जिह्यातील कानाकोपऱयातील राजकारण असो. श्रीपाद राजगुरू यांचीं वार्तापत्रे राजकीय क्षेत्रात अनेकदा खळबळ उडवून देणारी ठरली. शहर-जिह्यातील अनेक प्रश्नांची बारीकसारीक माहिती त्यांना होती. प्रत्येक घटनेचे ते साक्षीदार होते. जे काही आहे ते रोखठोक अशी धारधार लेखणी श्रीपाद राजगुरू यांनी जपली. सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, त्या आधीच्या पिढीतील शंकरराव मोहिते, नामदेवराव जगताप आदी दिग्गज नेत्यांबरोबरच बाबुराव चाकोते, ब्रह्मदेव माने बनशेट्टी, युन्नूस शेख यांच्यापासून अलीकडच्या त्यांच्या पुढच्या पिढीतील राजकीय-सामाजिक क्षेत्रात असलेल्या प्रत्येकाशी त्यांचा वैयक्तिक संपर्क होता. राजगुरूंनी एखाद्या व्यक्तीबद्दल कडवट टीका केली तर पुढच्या वार्तापत्रात त्या व्यक्तीचं चांगल्या कामाचं कौतुकही तितक्याच मोठय़ा मनानं करत होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या निधनाने जुन्या काळातील निर्भीड व अभ्यासू पत्रकार हरपला आहे.























































