
>> डॉ. सतीश नाईक (मधुमेहतज्ञ)
दवाखाने बंद झाले होते. अनेक डॉक्टर्सनी ज्येष्ठतेच्या मापदंडानुसार घरी बसणे पसंत केले होते. पण काही डॉक्टर्स मात्र मा. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मान देत या कोरोना लढाईत सक्रीय सहभागी झाले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक डॉक्टरांनी दवाखाने अचानक बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय झाली खरी, पण असेही डॉक्टर होते ज्यांनी त्यांचे एकदाही दवाखाने बंद ठेवले नव्हते. त्यातून त्यांच्या कामाची श्रद्धा दिसते. पण ज्यांना सुरू ठेवता आले नाहीत त्यांची त्यामागची काय भावना होती ते जाणून घेऊया.
सुरुवातीच्या काळात हा आजार नवीन असल्याने आणि नेमका अंदाज नसल्याने डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवणे यात जोखीम खूप होती. एक विशिष्ट प्रकारे काळजी घेऊन सगळं चालू ठेवणं तसे कठीण नव्हते. त्यात मोठी समस्या होती ती सुरुवातीच्या काळात ज्येष्ठांचा अनुभव हा ज्युनिअर्सना तेवढय़ा प्रमाणात मिळाला नाही. कारण यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो अनुभव. तसेच कोरोना हा नवीन आजार असल्यामुळे तशा प्रकारचे रुग्ण कोणी कधी हाताळले नव्हते. ज्यांनी ज्यांनी निदान वायरल, न्युमोनियासारखे आजार हाताळले अशा लोकांपर्यंत पोहोचायला हवे होते. उदाहरणार्थ सुरुवातीला मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा असतो तेव्हा नवीन डॉक्टर नेहमी सीनिअर्सच्या हाताखाली शिकतात. पुस्तकी ज्ञान आणि पुस्तकी ज्ञानाचे सरावात असलेले स्थान हे सगळं त्यातून अधोरेखित होतं. आपल्याकडे सुरुवातीला जो संवाद साधला गेला पाहिजे होता तो तितका प्रभावी न झाल्याने त्याचा अनेक डॉक्टरांवर नकारात्मक परिणाम झाला. त्यांना असे वाटले की आपल्याला काही झाले तर पुढे काय, आपल्या कुटुंबाच्या भविष्याचे काय, अशी त्यांच्या मनात असुरक्षित भावना निर्माण झाली. सुरुवातीला काहीच कळत नसल्याने आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणेच डॉक्टरांना जिवाची पर्वा असल्याने सुरुवातीला दवाखाने बंद दिसण्याचे हेही कारण असू शकते. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर्संना आवाहन केले तेव्हा अनेक निवृत्त डॉक्टर जिवाची पर्वा न करता पुढे आले. त्यांचे कौतुकही करण्यात आले. पण या काळात बऱयाच डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात मलाही करावा लागला. मी वांद्रय़ाला राहतो आणि माझे क्लिनिक मीरारोडला आहे. मला या काळात दोन मोठय़ा अडचणी आल्या. मी क्लिनिकमध्ये जायचे ठरवले पण आमच्या सोसायटीने आक्षेप घेतला. कारण सुरुवातीला लोकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यामुळे अनेक डॉक्टरांना इच्छा असतानाही क्लिनिकपर्यंत पोहोचताना अडचणी येत असतील हेही तितकेच खरे आहे. त्या अडचणींवर मात कशी करायची त्यावर सुरुवातीला काहीच पर्याय नव्हता. बरं, त्या सोसायटीमध्ये आपल्याला नंतरही राहायचे आहे. त्यासाठी त्या सोसायटीतील लोकांचे सहकार्य हे लागणारच हे एक कारण होते.
रुग्ण काय करतात, डॉक्टरांनी आज दिलेले प्रिसक्रिप्शन दोन ते तीन वर्षं तेच वापरतात. यावर काही कंट्रोल आहे काय. हायबीपी, कोलेस्ट्रोल, मधुमेह हे जे अत्यंत महत्त्वाचे आजार आहेत. त्या आजारांमुळे कोरोनाकाळात मृत्यूदर वाढला. मृत्यूदर वाढवणारे जे आजार आहेत याच्यावर जर नियंत्रण असेल तर बऱयाच समस्या कमी झाल्या असत्या. पण दुर्दैवाने त्यामुळेच जास्त समस्या निर्माण झाल्या. आपली रोगप्रतिकारशक्ती गरजेपेक्षा जास्त सक्रिय होत रोगांशी लढण्याऐवजी स्वतःच्याच शरीराचं नुकसान जेव्हा करू लागते तेव्हा त्याला ‘सायटोकाईन स्टॉर्म’ म्हणतात. सायटोकाईन स्ट्रॉर्म झालं की माणसाचं हृदय अचानक काम करायचं बंद करतं, किडनी प्रॉब्लेम करायला लागते आणि जास्त लोकांचा जीव हा सायटोकाईन स्टार्म यामुळे गेलेला आहे. त्यामुळे ज्यांची अशा प्रकारची आजाराची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांना कोरोना झाल्यावर अनेक अडथळे येत आहेत. डॉक्टर हेसुद्धा ज्येष्ठ नागरिक असतात. मधल्या काळात याबाबत भीती जास्त वाढली. याला हात लावू नका, त्याला हात लावू नका. मुद्दा एवढाच की तो वायरस नाकातून श्वासावाटे आतमध्ये येऊ शकतो आणि तो आतमध्ये शिरला की गोंधळ घालू शकतो. नाक आणि तोंडाचा नऊ इंच भाग झाकून ठेवला तर सहसा काही त्रास होत नाही. अशा काही गोष्टी झाल्या त्याचे एक्स्प्लॉयटेशन खूप झालं. डॉक्टरांचा मुद्दा जे कुठलेही प्रोटेक्शन नसताना जो कायदा होता त्यात बदल घडवायला पाहिजे होता. त्यामुळे कारवाईच्या वगैरे गोष्टी होत्या त्याने बरेच लोक पुट ऑफ झाले. मग मिळालेल्या संधीचा पासष्टच्या वरच्या लोकांनी क्लिनिकमध्ये जायचे नाही असे झाले. त्याचबरोबर दवाखान्यात पूर्ण काळजी न घेता येणाऱया रुग्णाला तपासायचे कसे, जे रुग्ण नाक, तोंडाला मास्क लावत नाही किंवा त्यांचे हनुवटीवर मास्क असते याला उपचार कसे करणार, हाही मुद्दाच आहे.
टेलिकन्सल्टेशन चांगला पर्याय आहे
कोरोनाकाळात टेलिकन्सल्टेशन हा सर्वात चांगला पर्याय आहे. त्यासाठी क्लिनिकला भेट देण्याची गरज नाही. रहदारीमध्ये गोंधळ होणार नाही, कामापासून रजा घेण्याची गरज नाही, ज्या रुग्णांना संसर्गजन्य रोग असू शकतात त्यांच्याशी जवळचा संपर्क होण्याचा धोका नाही. त्यासाठी एक तर तुमचे नेहमीचे डॉक्टर असतात, त्यांना फोन करतात. त्यामुळे त्यांची साधारण फी किती आहे याचा आपल्याला अंदाज असतो.



























































