चला पाहूया महापालिका मुख्यालय! सर्वसामान्यांना घडणार 127 वर्षांच्या ऐतिहासिक इमारतीची सफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc

गॉथिक शैलीतील मुंबई महानगरपालिकेची सुमारे 127 वर्षांपूर्वीची पुरातन वास्तू आता पर्यटकांना पाहता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर पर्यटकांना या पुरातन वास्तूची सफर करता येणार आहे. पालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात आज याबाबत सामंजस्य करार झाला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा करार झाला.

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची चार मजली इमारत ही सुमारे 127 वर्षांपूवाची आहे. गॉथिक शैलीतील दगडी कामकाज हे अत्यंत आकर्षक असून पालिकेची ही इमारत जागतिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये मोडते. या इमारतीबरोबर पालिकेची सहा मजली विस्तारित इमारतही आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर या इमारतीतही गाईडच्या मदतीने या पुरातन वास्तूची माहिती (गाईडेड हेरिटेज वॉक) घेता येणार आहे. पालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्य़ा केल्या. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत पालिकेच्या मालकीच्या अनेक महत्त्वाच्या पुरातन आणि नवीन वास्तू आहेत. काही वास्तूंना पुरातन महत्त्व आहे तर नवीन वास्तू या उपयोग, संपर्प आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अत्यंत दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. जसे, अग्निशमन दलाचे मुख्यालय आहे. भविष्यात अशा प्रकारे जुन्या आणि नव्या वास्तू टप्प्याटप्प्याने पर्यटकांना पाहता येतील का, याचाही विचार सुरू आहे.’ – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील या इमारतीत मुंबईचा कारभार कसा चालवला जातो, लोकप्रतिनिधी कामकाज कसे करतात, हे पाहण्यासाठी आता पर्यटक या इमारतीत येऊ शकतील. या संस्थेची ही ऐतिहासिक वास्तू अनेक घटनांची, महत्त्वाच्या क्षणांची साक्षीदार आहे. आता या वास्तूचे आंतरबाह्य सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल.मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.’ –आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री