
तनिष्क या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची नवी जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीमध्ये हिंदू-मुस्लिम एकता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हा लव जिहादला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत जाहिरातीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. तनिष्कवर बंदी घालण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जाऊ लागली. ट्विटरवर #बॉयकॉट तनिष्क हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. या सर्व वादविवादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने प्रदर्शित केलेली ब्रँडची जाहिरात मागे घेतली.
तनिष्कची 43 सेकंदांच्या ही जाहिरात दागिन्यांचा ‘एकत्वम’ हा ब्रँड प्रमोट करण्यासाठी तयार करण्यात आली. युटय़ूबवर पोस्ट केलेल्या या जाहिरातीच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले होते, ‘तिच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया करणाऱ्या घरात ती लग्न होऊन गेली. तिच्यासाठीच त्यांनी त्यांच्यात सहसा साजरा न होणारा सोहळाही साजरा केला. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीचा हा सुंदर मिलाफ आहे.’ ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तिचा संबंध लव जिहादची जोडण्यात आला. जाहिरातीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली आणि ती पाहता पाहता सोशल मीडियावर वादाचा विषय बनली. नेटकरी या जाहिरातीच्या बाजूने आणि विरोधात बोलू लागले. तर अनेकांनी तनिष्क कंपनीचे दागिने विकत घेणार नसल्याचे सांगत या ब्रँडला बायकॉट करण्याची मागणी सुरू केली. ट्विटरवर लोकांनी जाहिरातीसंदर्भात वेगवेगळ्या पोस्ट, कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. वाद वाढल्यानंतर सुरुवातीला तनिष्कने युटय़ूब आणि फेसबुकवर कमेंट्स तसेच लाईक्स-डिसलाईक्स बंद केल्या. नंतर मात्र त्यांनी ती जाहिरातच काढून घेतली.
काय आहे जाहिरातीमध्ये?
जाहिरातीमध्ये एका हिंदू महिला दाखवण्यात आली असून तिचा विवाह मुस्लिम कुटुंबात होतो. व्हिडीओमध्ये महिलेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. यादरम्यान मुस्लिम कुटुंबिय हिंदू प्रथेनुसार, आपल्या सुनेचे डोहाळे जेवण करताना दाखवले आहे. व्हिडीओच्या शेवटी गरोदर महिला आपल्या सासूला विचारते की, ‘आई ही प्रथा तुमच्या घरात तर होत नाही ना?’ यावर तिची सासू म्हणते की, ‘मुलींना खूश करण्याची प्रथा तर सगळ्याच घरांमध्ये असते ना?’
शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी
ट्रोल होणाऱ्या तनिष्कच्या जाहिरातीसंदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली. थरूर यांनी जाहिरातीचा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, हिंदू- मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या या सुंदर जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली. जर हिंदू-मुस्लिम ‘एकत्वम’चा या सर्वांना एवढा त्रास होत असेल, तर ते लोक हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सदासर्वकाळ टिकून असलेल्या प्रतीकावरच म्हणजे आपल्या देशावर बंदी का घालत नाहीत?


























































