
रिपब्लिक टीव्हीचा मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना विधिमंडळाने विशेषाधिकार भंगाची दुसरी नोटीस बजावली आहे. यापूर्वी विधिमंडळाने अर्णब गोस्वामींना विशेषाधिकाराची नोटीस बजावली होती. त्यास उत्तर न दिल्याने त्यांना दुसरी नोटीस धाडण्यात आली असून त्याच्या उत्तरासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे
अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही शोदरम्यान मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहातील सदस्यांचा हा अवमान म्हणजे राज्यातील तमाम जनतेचा अवमान असून अशा पत्रकाराविरोधात हक्कभंग दाखल करा अशी मागणी करणारा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला होता. तर विधान परिषदेत भाई जगताप आणि मनीषा कायंदे यांनी अर्णब गोस्वामीच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. दोन्ही सभागृहांत हे प्रस्ताव स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार विधीमंडळाने 16 सप्टेंबरला अर्णब गोस्वामी यांना नोटीस बजावली होती. या नोटीसवर 5 ऑक्टोबरपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी खुलासा केला नाही. त्यामुळे आता 20 ऑक्टोबरपर्यंत खुलासा करण्यास मुदत दिली आहे. दरम्यान 16 सप्टेंबर रोजी बजावण्यात आलेल्या नोटीस त्यासोबत अर्णब गोस्वामींना विधान मंडळ सचिवालयाने विधानसभेचे कार्यवृत्तही पाठवले होते. हे कार्यवृत्त विधानसभेच्या नियमानुसार गोपनीय असून विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय या कार्यवृत्ताचा उपयोग न्यायालयीन कामकाज व इतर कोठेही करता येत नाही असे अर्णब गोस्वामी यांना कळवण्यात आले होते. पण तरीही अर्णब गोस्वामी यांनी हे कार्यवृत्त सर्वोच्च न्यायालयात दाखल करून त्यांनी विधानसभेच्या विशेषाधिकार भंगाचे उल्लंघन केले आहे.
























































