
महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची आघाडी कायम असून आज झालेल्या पाचपैकी तीन समित्यांवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. तर दोन ठिकाणी भाजप उमेदवारांचा विजय झाला. त्यामुळे आतापर्यंत निवडणूक झालेल्या एकूण 11 पैकी आठ समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेना उमेदवारांचा विजय झाला आहे.
प्रभाग समिती ‘पी-उत्तर’ अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या संगीता सुतार यांनी 10 मते मिळवत भाजपच्या उमेदवार दक्षा पटेल यांचा 2 मतांनी पराभव केला. तर ‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या आकांक्षा शेटय़े यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
‘के-पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रियांका सावंत यांनी 8 मते मिळवत भाजपचे अभिजित सामंत यांचा 3 मतांनी पराभव केला. तर ‘के-पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सुधा सिंग यांनी शिवसेनेचे राजू पेडणेकर यांचा केवळ एका मताने पराभव केला. तर ‘पी-दक्षिण’ प्रभाग समितीसाठी झालेल्या निवडणुकीत हर्ष पटेल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. आज झालेल्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांसाठी पीठसीन अधिकारी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर, उप महापौर अॅड. सुहास वाडकर होते.






























































