
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच भक्ताविना उद्यापासून शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे.देऊळ बंद असले तरी मंदिरातील नवरात्रोत्सवाचे सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार होणार असुन,करवीर निवासिनी श्रीअंबाबाई,दख्खनचा राजा श्रीजोतिबासह सर्व प्रमुख मंदिरातील तयारी पूर्ण झाली असून,उद्या मंदिरात परंपरेनुसार तोफेची सलामी देऊन घटस्थापना करण्यात येणार आहे.
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची स्वच्छता,रंगरंगोटी करण्यात आली असून,देवीच्या नित्य वापरातील सोने,चांदी, हिरे आदी दागिन्यांचे पाॅलीशही करण्यात आले आहे.आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.जिल्हातील सर्वच मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे.
नवरात्रीत देवीच्या विविध रूपांत पुजा
उद्या (आज) पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात परंपरेनुसार करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात अलंकारिक पुजा बांधण्यात येणार आहे.यामध्ये शनिवार दि. १७ ऑक्टोंबर रोजी घटस्थापनेला कुण्डलिनी स्वरुपात,रविवार,दि.१८ रोजी द्वितीया पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक,सोमवार,दि.१९ रोजी तृतीया नागकृत महालक्ष्मी स्तवन, मंगळवार,दि.२० रोजी चतुर्थीला सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम,बुधवार,दि.२१ रोजी पंचमी निमित्त गजारुढ अंबारीतील पूजा,गुरुवार,दि.२२ रोजी षष्ठीला श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती, शुक्रवार,दि.२३ रोजी सप्तमीला अगस्त्यकृत सरस्वती स्तवन,शनिवार,दि.२४ रोजी अष्टमीला महिषासुरमर्दिनी तर रविवार,दि.२५ रोजी दसरा निमित्त अश्वारुढ रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे.शिवाय या प्रत्येक दिवशी अनुक्रमे लाल,
पितांबरी,केशरी,निळा/जांभळा,लाल,पांढरा सोनेरी काट,पिवळा/लिंबू,लाल आणि दि.२५ रोजी कोणत्याही रंगाची साडी देवीला परिधान करण्यात येणार असल्याची माहिती प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव तसेच हक्कदार श्री पूजक मंडळाचे श्रीपूजक माधव मुनिश्वर यांनी दिली आहे.



























































