लेख – ‘प्रदूषणाची दिल्ली’ दूर नाही; सावध व्हा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रमेश कृष्णराव लांजेवार

वाढते प्रदूषण पाहता वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणात केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रणात आणले नाही तर ‘संपूर्ण हिंदुस्थान गॅस चेंबर’ बनायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रदूषण रोखण्याकरिता ज्याच्या ज्याच्या मनात जी जी कल्पना असेल तिचा वापर केला पाहिजे. ही धोक्याची घंटा आहे. प्रदूषणाला वेळीच रोखले नाही तर महाभयानक परिस्थिती उद्भवू शकते व अनर्थ होऊ शकतो. दिल्लीचे प्रदूषण पाहता सर्व राज्यांनाही ‘प्रदूषणाची दिल्ली’ दूर नाही याची जाणीव ठेवली पाहिजे.

कोरोनाने दिल्लीत चांगलाच कहर केला. त्यापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया यांनीसुद्धा जखडले आणि आता हिवाळा सुरू व्हायच्या आधीच वायुप्रदूषणाने ‘विक्राळ’ रूप धारण करून ‘दिल्ली गॅस चेंबर’ बनली आहे. दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे व दिल्ली गॅस चेंबर झाल्यामुळे वायुप्रदूषणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दिल्लीकरांना कोरोनासोबतच प्रदूषणाचा सामनासुद्धा करावा लागत आहे. ही अत्यंत चिंतेची व गंभीर बाब आहे. ‘राजधानी दिल्ली’ गॅस चेंबर बनली तर देशाचे काय होईल, हीसुद्धा चिंता आहे.

एकीकडे दिल्ली हिंदुस्थानची राजधानी आणि दुसरीकडे जगात दिल्लीसारखे प्रदूषण कोणत्याही देशात नसल्याचे सांगण्यात येते. याचाच अर्थ असा की, संपूर्ण दिल्ली गॅस चेंबर बनल्याचे स्पष्ट दिसून येते. आताही हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठय़ा प्रमाणात ‘पराली’ जाळल्याने दिल्ली एनसीआरमध्ये विषारी हवा मोठय़ा प्रमाणात निर्माण होत आहे व ती घातक सिद्ध झाली आहे. दिल्ली सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी दरवर्षी ऑड-ईव्हन फार्म्युलाद्वारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करीत असते, परंतु दरवर्षी ऑक्टोबरपासूनच प्रदूषण विक्राळ रूप धारण करण्यास सुरुवात करीत असते. त्यामुळे ऑड-ईव्हन फार्मुल्यावरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने प्रदूषणाच्या बाबतीत सरकारी अधिकाऱयांची निष्काळजी असल्याचे सांगण्यात येते. दिल्लीतील प्रदूषणाचे सावट एका दिवसात तयार झाले नसून ते ‘कासवाच्या गतीने’ वाढत आहे आणि आता उग्र रूप धारण केल्याचे दिसून येते. आज प्रदूषणामुळे दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही दिल्लीसह देशात ‘सरकारी वाहन’ मोठय़ा प्रमाणात विषारी धूर ओकत आहेत. सोबत त्याला कारखान्याच्या धुराचा साथ मिळत आहे व दूषित पाणी त्याला दुजोरा देत आहे अशाप्रकारे प्रदूषणाचा व्याप दिवसेंदिवस वाढताना दिसतो. या सर्व बाबींना मुख्य कारण म्हणजे वृक्षतोड व निसर्गावर मानवाने केलेला अन्याय होय. आज वृक्षतोडीमुळे संपूर्ण देशाच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्याचेच प्रायश्चित्त आज दिल्लीला ‘प्रदूषणाच्या’ रूपात दिल्लीकरांना भोगावे लागत आहे. आज प्रदूषण विकत घेण्याकरिता कोणत्याही देशाला बाजारात जावे लागत नाही. कारण आज प्रत्येक देश परमाणू शस्त्र्ाास्त्र्ाांच्या चाचण्या मोठय़ा प्रमाणात करताना दिसतात. सोबतच अनेक देशांमध्ये गृहयुद्ध चरणसीमेवर आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण देशाजवळ अत्याधुनिक दारूगोळय़ाचे भांडार मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे आज संपूर्ण जग दारूगोळय़ाच्या ढिगाऱयावर बसलेले दिसून येते. याचा परिणाम म्हणजे आज संपूर्ण जग विनाशाकडे जाताना दिसते.

जगात प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीचा प्रथम क्रमांक लागतो ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आहे. आज दिल्ली म्हटले म्हणजे हिंदुस्थानचा देश-विदेशचा व्यवहार दिल्लीतूनच चालत असतो. महत्त्वपूर्ण ऑफिसेस दिल्लीमध्ये आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर सुप्रीम कोर्ट, संसद भवन, राष्ट्रपती भवन, संपूर्ण मंत्रालये, जगातील राजदूत आदी. दिल्ली हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. अशा ठिकाणी महाभयानक प्रदूषण म्हणजे अत्यंत गंभीर बाब आहे. दिल्लीतील प्रदूषणाची धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीत इतके प्रदूषण वाढले आहे की, एक व्यक्ती 50 सिगारेट पिऊन धूर काढतो इतके प्रदूषण दिल्लीमध्ये आहे ही एक धोक्याचीच घंटा आहे. प्रदूषणाला फक्त फटाकेच जबाबदार नसून लाखो वाहनांचा विषारी धूरसुद्धा जबाबदार आहे. आज धुळीतील व वायुतील प्रदूषणाने मानव, पशु-पक्षी, जीवजंतू यांना धोका निर्माण झाला आहे. वाढते प्रदूषण पाहता असे वाटते की, दिल्लीसह हिंदुस्थान विनाशाकडे जात आहे की काय? त्याचप्रमाणे वाढत्या प्रदूषणामुळे अनेक जंगली पशु-पक्षी लुप्त होत आहेत. वाढते प्रदूषण पाहता वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणात केली पाहिजे. प्रदूषण नियंत्रणात आणले नाही तर ‘संपूर्ण हिंदुस्थान गॅस चेंबर’ बनायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रदूषण रोखण्याकरिता ज्याच्या ज्याच्या मनात जी जी कल्पना येत असेल तर याचा वापर केला पाहिजे. जल, वायु व स्थल प्रदूषण ‘विक्राळ रूप’ धारण करीत असल्याचे दिसून येते. ही बाब एकटय़ा दिल्लीच्या प्रदूषणावरून दिसून येते. याला कारणीभूत फक्त मानवच आहे. त्यामुळे यापासून तोडगा मानवालाच काढावा लागेल. ‘लॅन्सेट मेडिकल जर्नल’च्या अहवालावरून असे दिसून येते की, प्रदूषणाच्या बाबतीत संपूर्ण जगाचा विचार केला तर ‘हिंदुस्थान प्रदूषणाचे माहेरघर’ बनल्याचे दिसून येते. यात दिल्ली एनसीआर अव्वल क्रमांकावर आहे. ‘प्रदूषणाचा राक्षस’ असाच आपल्यात वावरत राहिला तर 130 कोटी जनतेच्या ‘काळजात घर’ करून राहील आणि आपल्याला विनाशाकडे नेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रदूषणावर उपाय तातडीने योजण्याची गरज आहे. प्रदूषण हटविण्याकरिता केंद्र व राज्य सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व पर्यावरण मंत्रालय यांनी जातीने लक्ष देऊन युद्धपातळीवर उपाय योजावे.

दिल्ली हिंदुस्थानची राजधानी आहे आणि याच ठिकाणी उच्च पदस्थ मंडळी राहतात. अशा ठिकाणी जर प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर देशाचे काय होईल, अशी भीती वाटत आहे. देशातील राज्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, सर्वांसाठी ‘दिल्ली दूर नाही’ त्यामुळे आजच सावध व्हा आणि पर्यावरणाला वाचवून प्रदूषणावर मात करा. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु प्रदूषणाचे इतके गंभीर परिणाम होईल असे दिल्लीकरांना वाटत नव्हते, परंतु आज दिल्लीत आरोग्यासाठी आणीबाणी लागल्याचे दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2018 च्या अहवालानुसार जगातील दर 10 माणसांपैकी 9 माणसे असुरक्षित आणि प्रदूषित हवा श्वासावाटे शरीरात घेत आहेत. 2019 च्या जागतिक प्रदूषण निर्देशांकानुसार जगातील शंभर सर्वाधिक प्रदूषित शहरे बघितली तर त्यापैकी 28 शहरे ही केवळ हिंदुस्थानातील आहेत. हा अहवाल अत्यंत गंभीर आहे आणि चिंतेचा विषय आहे. प्रदूषणाच्या बाबतीत केंद्राने केजरीवाल यांना दोष द्यावा व केजरीवाल यांनी केंद्राला दोष द्यावा हा संघर्ष योग्य नाही. प्रदूषणाच्या बाबतीत एकत्र येऊनच तोडगा काढला पाहिजे. आज हवेतील प्रदूषण प्रथम क्रमांकावर व पाणी प्रदूषण दुसऱया क्रमांकावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे मानवाचा व पशु-पक्ष्यांचा जीव गुदमरत आहे. आज वाढत्या प्रदूषणामुळे व वृक्षतोडीमुळे जंगलातील हिंस्र पशू शहराकडे प्रवेश करताना दिसतात. केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कोरोना संक्रमण जास्त आहे. अशा परिस्थितीत दिल्लीमध्ये प्रदूषण भर टाकताना दिसत आहे. याला कोठे तरी रोखलेच पाहिजे. ही धोक्याचा घंटा आहे. याला वेळीच रोखले नाही तर महाभयानक परिस्थिती उद्भवू शकते व अनर्थ होऊ शकतो. दिल्लीचे प्रदूषण पाहता संपूर्ण राज्यांनीही ‘प्रदूषणाची दिल्ली’ दूर नाही याची जाणीव ठेवली पाहिजे.