मराठी रंगभूमी आणि कोरोनाचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलय रमाकांत वैद्य

आज 5 नोव्हेंबर. मराठी रंगभूमी दिन. सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या आशीर्वादाने ‘सीता स्वयंवर’ हे पहिलंवहिलं मराठी नाटक रंगभूमीवर आलं. हा प्रयोग सांगलीच्या राजदरबारात झाला. तो दिवस होता 5 नोव्हेंबर 1843. ‘सीता स्वयंवर’चे सर्वेसर्वा अर्थात विष्णुदास भावे. नाटय़ लेखन, गीतं, दिग्दर्शन…सारं भाव्यांचं. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजे 5 नोव्हेंबर 1943 रोजी ‘सीता स्वयंवर’चा शतक महोत्सवी सोहळा सांगलीत आयोजित करण्यात आला. तेव्हापासून 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या मुहूर्तावर 50 टक्के क्षमतेसह राज्यातील नाटय़गृहे हे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला हे चांगलेच झाले.

आपल्या मराठी रंगभूमीला तब्बल 177 वर्षांची परंपरा आहे. पूर्वी पौराणिक, ऐतिहासिक नाटपं व्हायची. नंतर सामाजिक नाटकांनी जोर धरला. कालांतराने विनोदी नाटपं, फार्सिकल नाटपं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. व्यावसायिक रंगभूमीबरोबरच समांतर रंगभूमी सशक्त झाली. मराठी रंगभूमीने फक्त सुवर्णकाळ पाहिला असं नाही. वेळोवेळी संकटं आली, रंगभूमीला हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात दुरावा निर्माण झाला. कधी जातीय दंगली झाल्या तर कधी बॉम्बस्पह्ट. कधी पावसाने झोडपून काढलं. टीव्ही, सीरियल, चित्रपट, वेब सीरिज यांच्या जोडीला क्रिकेटचे सामने आहेतच, पण…कोविडसारख्या महामारीने सगळं जग उद्ध्वस्त झालं, उद्योगधंदे बुडाले. शाळा, का@लेजांमध्ये टाळेबंदी झाली. नाटक, चित्रपट धंद्याला मोठी झळ बसली. मराठी रंगभूमी गेले सात-आठ महिने बंद आहे. हा भीषण कालावधी आणि त्यानंतरची मराठी रंगभूमी, तिचे भविष्य याविषयी रंगकर्मी काय म्हणतात याचा थोडक्यात आढावा.

निर्माता जगला तर नाटक जगेल – लता नार्वेकर

कोविड संकटाविषयी काय बोलावं! इतके भयंकर दिवस मराठी नाटय़दृष्टीने गेल्या पावणेदोनशे वर्षांत पाहिले नव्हते. नाटकांनी अनेक चढउतार पाहिले. कधी क्रिकेटचे सामने तर कधी चांगले चित्रपट यामुळे नाटय़गृहातील प्रेक्षकांची संख्या रोडावली, कधी अतिवृष्टीमुळे प्रयोग रद्द करावे लागले, पण ही तात्पुरती संकटं होती. त्यांची तुलना कोविड महामारीशी होऊ शकत नाही. पण भविष्यकाळाविषयी मी पूर्ण आशावादी आहे. दर्जेदार नाटय़निर्मिती करणारे निर्माते, लेखक, दिग्दर्शक पुन्हा नव्याने उभे राहतील. अर्थात हे सगळं कोविडचा धोका नष्ट झाल्यानंतर. छोटय़ा नाटय़निर्मात्यांसाठी भविष्यकाळ कठीण आहे. सर्वांना टिपून राहायचं असेल तर सामूहिक प्रयत्न होणं जरुरीचं आहे. भविष्यात नाटकाच्या तिकिटांचे दर ठरवताना निर्मात्यांनी विचार करायला हवा. थिएटर मालकांनी  थिएटर भाडेदराचा पुनर्विचार करायला हवा. कलाकारांनी अवाच्या सवा नाईट आकारू नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी पातळीवरसुद्धा नाटय़ व्यवसायाला कशी संजीवनी मिळेल याचा सकारात्मक विचार व्हायला पाहिजे. निर्माता जगला तरच मराठी रंगभूमीचा पुनर्विकास शक्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून याकडे पाहण्याची नितांत गरज आहे.

(निर्माती, श्री चिंतामणी)

नाटक अखेर सुरू होणार – प्रसाद कांबळी

नाटय़कला ही जिवंत कला आहे. इथे कलाकार आणि प्रेक्षक आमने सामने असतात. चांगलं नाटक पाहायला प्रेक्षक गर्दी करतात. म्हणजेच नाटक व्यवसायात ‘सोशल डिस्टन्सिंग’ अशक्य आहे. गेले आठ महिने सगळे रंगकर्मी घरी बसले आहेत. त्यामुळे शासनाने नाटय़ व्यवसायाकडे गांभीर्याने बघायला हवं,  हॉटेलं, मॉल, व्यायामशाळा उघडल्या, आता नाटपं कधी सुरू होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर रंगभूमी दिनाच्या मुर्हूतावर कोनोराच्या अटींसह नाटय़गृह खुली करण्यास परवानगी दिली हे चांगलेच झाले. अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने आम्ही आमचं कार्य करत आहोत. यात ‘नाटय़कर्मी मदत निधी’ उभारण्यात येत आहे. आम्ही 10 कोटी रुपयांचं ध्येय ठेवलेलं आहे. त्याची सुरुवात आम्ही नाटय़ परिषदेपासून केली आहे. आम्ही 50 लाख रुपयांचा निधी रंगकर्मी मदत निधीसाठी दिला. या माध्यमातून गरजू रंगकर्मींना मदत मिळत आहे. यात रंगमंच कामगार, तंत्रज्ञ, कलाकार, बालरंगभूमी, निर्माता संघ या सर्व घटक संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गोदरेजसारख्या पंपनीने ‘का@र्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या माध्यमातून परिषदेला मदत केली. हे सारं होत असताना नाटकाच्या सर्व घटकांनी म्हणजे निर्माते, कलाकार, नाटय़गृह चालक, महानगरपालिका, राज्य शासन यांनी एकत्र येऊन सर्व शक्तींसह प्रयत्न केले तर कोविड संकटातून आपली रंगभूमी लवकरात लवकर बाहेर येईल.

(अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद.निर्माता– भद्रकाली प्रॉडक्शन)

नाटय़ क्षेत्राला सर्वाधिक झळ – निवेदिता जोशी-सराफ

कोविडमुळे सगळय़ा उद्योगांची पार वाट लागली आहे, पण नाटय़ क्षेत्राला त्याची सर्वात जास्त झळ लागली आहे. सगळे व्यवसाय हळूहळू सुरू करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पण नाटय़ व्यवसाय ठप्प आहे. त्याचं कारणही तसं आहे. चांगलं, व्यावसायिक नाटक म्हणजे तुफान गर्दी आणि गर्दी ही कोरोनासाठी घातक आहे. हॉटेल्समध्ये एक टेबल सोडून ग्राहक बसू शकतात, पार्सल घरी घेऊन जाऊ शकतात, होम डिलिव्हरी मागवू शकतात, पण नाटकांचं तसं नाही. नाटकांचं गणित वेगळं आहे. मला यानिमित्ताने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. कोविडमधून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर स्वच्छतेची मूलभूत गरज आहे, पण नाटकाच्या थिएटरमध्ये कायम स्वच्छतेचा अभाव असतो. मी वयाच्या दहाव्या वर्षापासून नाटकात काम करू लागले. म्हणजे मी तब्बल 47 वर्षे रंगभूमीवर काम करतेय, पण स्वच्छतागृह, मेकअप रूम ही ठिकाणं नेहमी गलिच्छ असतात. असे प्रश्न कोणीही सोडवताना दिसत नाही. आता तरी आपण शहाणे होणं गरजेचं आहे. तरी मी नाटय़ व्यवसायाविषयी आशावादी आहे. लोक बाजारात, दुकानात गर्दी करताना दिसतात. मग नाटक पाहायला लोक का नाही येणार? जरूर येतील, पण लोक नियम पाळताना दिसत नाहीत. सगळी जबाबदारी सरकारवर टापून चालणार नाही. सरकार म्हणजे कोण, आपणच ना? कोविड काळ आणि भविष्य ही दोन नाटय़ व्यवसायासाठी मोठी आव्हानं आहेत. ती पेलायची असतील तर सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. यात निर्माते, नाटय़गृहवाले आणि कलाकार आले. मी एक कलाकार म्हणून माझ्या मानधनात तडजोड करण्यासाठी तयार आहे. तसा विचार सर्वांनी करायला हवा.

ऑनलाइन नाटकांचा विचार व्हावा – पुष्कर श्रोत्री

नाटकाचा प्रेक्षक सुजाण आहे. नेहमी प्रेक्षकांनी नाटक धंद्याला साथ दिलीय. त्याप्रमाणे कोविड संकट ओसरल्यानंतर परत एकदा प्रेक्षक नाटकाकडे नक्की वळतील. आपले प्रेक्षक मायबाप आहेत. कोविडनंतरही ते नाटकाच्या पाठीशी उभे राहतील. नाटक तगण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणं जरुरीचं आहे. यात निर्माते, कलावंत, प्रेक्षक या सगळय़ांचा समावेश आहे. थिएटर मालकांनी स्वच्छतेचा मुद्दा प्राधान्याने सोडवला पाहिजे आणि या सगळय़ांना शासनाने योग्य रीतीने सहकार्य करायला हवं. आजच्या काळात निर्माता होणं खूप कठीण आहे. थिएटरचं भाडं, जाहिरातीचा खर्च, कलाकारांचं मानधन हे खर्च आहेत. इतपं करून नाटक चालेलच असं नाही. ते एक आव्हानच आहे. ऑनलाइन नाटक हेदेखील एक माध्यम आहे. त्याचा विचार व्हायला हवा. मला वाटतं, जुन्या नाटकांच्या बाबतीत ऑनलाइन नाटक हा पर्याय होऊ शकतो.