मल्टीप्लेक्सचालक साधणार दिवाळीचा मुहूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे सात महिने बंद असलेली थिएटर पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याने थिएटर चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थिएटरमध्ये आवश्यक बदल, साफसफाई आणि निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अशा कामांना वेग आला असून थिएटरचालक पुढच्या आठवडय़ात किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरची दारे प्रेक्षकांसाठी खुली करण्याच्या तयारीत आहेत.

कोरोनामुळे मार्चपासून देशभरात थिएटर बंद असल्याने मल्टिप्लेक्सचे आतापर्यंत 10 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. हळूहळू सर्व राज्यात थिएटर पुन्हा सुरू होत असल्याने थिएटरचालक आशावादी आहेत. आयनॉक्स मल्टिप्लेक्सचे सीओओ राजीव पतनी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आमचे पहिले प्राधान्य स्वच्छता आणि सुरक्षिततेला असणार आहे. त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे. पेपरलेस तिकीट, डिजिटल पेमेंट, थर्मल स्क्रिनिंग, का@न्टॅक्टलेस एन्ट्री अशा उपाययोजना आम्ही केल्या आहेत. साधारण दिवाळी किंवा त्याआधी आम्ही थिएटर पुन्हा सुरू करू. मल्टिप्लेक्स चेन कार्निवल देखील पुढच्या आठवडय़ात थिएटर सुरू करण्याची शक्यता आहे.

प्रेक्षक नक्कीच साथ देतील !
सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, यापूर्वी काही राज्यात थिएटर सुरू होऊन देखील त्यांना नवीन सिनेमे मिळत नव्हते. महाराष्ट्र हे चित्रपट व्यवसायाच्या उलाढालीचे मुख्य केंद्र आहे.महाराष्ट्रात थिएटर सुरू होत असल्याने हिंदीतले निर्माते आता आपले रखडलेले चित्रपट दिवाळी दरम्यान प्रदर्शित करण्याची शक्यता आहे.यानिमित्ताने प्रेक्षकांची पावले पुन्हा थिएटरकडे वळतील, अशी आम्हाला आशा आहे.