पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. वैजनाथ महाजन

आपल्या माय-बाप सरकारने चालू सप्ताह पक्षी संवर्धन सप्ताह म्हणून साजरा व्हावा, असे अधिकृतरीत्या जाहीर करून एक अत्यंत नामी आणि तितकाच आल्हाददायक असा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत असंख्य पक्षीतज्ञ आणि प्राणीमित्र या क्षेत्रात जीवतोड मेहनत करत आहेत, पण आता या निर्णयामुळे त्यांच्या सर्व कामाला एक अधिकृत मान्यता आणि पक्षी संवर्धनाकरिता भविष्यकाळात होणारी जागरूकता या सर्वालाच एक आशा पल्लवीत करून टाकणारी अशी महती प्राप्त झाली आहे. अर्थात हे जाहीर करण्यामागेही फार मोठे आणि तितकेच आनंददायी वाटावे असे कारणही शोधण्यात आलेले दिसते. कारण याच सप्ताहात वनमहर्षी मारुती चित्तमपल्ली यांचा वाढदिवस आणि पक्ष्यांचे पितामह म्हणून ओळखले जाणारे पक्षीगुरू सलीम अली यांचा स्मृतिदिन आहे. पक्षी संवर्धन सप्ताहाकरिता यासारखे अन्य औचित्त्य नाही. मराठी मुलूख हा आजही नांदत्या पक्ष्यांचा मुलूख आहे. असंख्य पक्षी आणि अगणित पाखरे ही महाराष्ट्राची फार मोठी शाश्वत अशी दौलत आहे. आता ही दौलत जोपासण्याची जबाबदारीच जाहीर करण्यात आलेली आहे. अर्थात असे पक्षीहिताचे आणि प्राणीजगताचे कामही काही एखाद्या संघटनेची वा समूहाची जबाबदारी असत नाही तर ती प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे हेच यानिमित्ताने सुचित करण्यात आलेले आहे. अलीकडेच पुणे येथे अंकुश पटवर्धन यांनी पाखरांची प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. या प्रयोगशाळेत पाखरे कोणत्या झाडावर अंडी घालतात व ती जपावीत कशी? याचाही शास्त्र्ाशुद्ध अभ्यास होतो आहे. आज या प्रयोगशाळेत किमान 25च्या वर पाखरे भिरभिरत असून त्यांचा अभ्यास होतो आहे. भविष्यात आपणास पक्ष्यांच्या अशाच प्रयोगशाळा विकसित करण्याची फार मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. त्याकरिता यापूर्वी महाराष्ट्रात दिसून आलेले सुचिन्ह म्हणजे महाराष्ट्रात प्रतिवर्षी साजरे होणारे पक्षी संमेलन हे होय. आपल्याकडील अनेक पक्षीतज्ञ पक्ष्यांवर साहित्य निर्माण करीत आहेत. त्यांच्या सवयी, त्यांची घरटी, त्यांची भरारी आणि त्यांची वंशवृद्धी याचा पण सातत्याने अभ्यास होत आहे. वाढते प्रदूषण, गाडय़ांचा गोंगाट आणि तेवढीच अंगावर येणारी वाढत चाललेली गर्दी यामुळे पक्षी भेदरून जातात. मनुष्य वस्तीला धास्तावलेले पक्षी उद्या जर जंगलात पलायन करू लागले तर मानवी जीवनावर याचा अनिष्ट परिणाम होणार आहे. सलीम अली यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण आपल्याकरिता नोंदवून ठेवलेले आहे आणि ते म्हणजे पक्षी पिकांची कधी हानी करीत नाहीत तर किडे आणि किटक हेच पिकांचे खरे शत्रू असतात. या किडय़ांना आणि किटकांना संपविण्याची जबाबदारी पक्षीच उचलत असतात. त्यामुळे पक्षी हा माणसाचा शाश्वत मित्र आहे आणि मानवी संस्कृतीची ती एक फडकती पताकाही आहे. आपण मोर हा राष्ट्रीय पक्षी मानतो. भविष्यात या खंडप्राय देशात एकाही मोराची हत्या होणार नाही याची जबाबदारी यानिमित्ताने सर्वांनी स्वीकारली पाहिजे असे वाटते. ‘‘पक्षी जाय दिगंतरा’’ असे नेहमी म्हटले जाते. दिगंतराला गेलेले पक्षी पुन्हा जेव्हा आपल्या अंगणात येऊन बागडू लागतील तेव्हा प्रत्येक अंगणाला पक्ष्यांची पहाट फुलत असल्याचा मनस्वी आनंद होईल. या आनंदाकरिताच प्रत्येकाने पक्षीमित्र व्हावे असेच आपणा सर्वांना जर वाटू लागले तर पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे याचे सुखद प्रत्यंतर तुम्हा-आम्हा सर्वांनाच येईल अशी अपेक्षा आहे.