
>> गुरुनाथ वसंत मराठे
‘दिवाळीत फटाके फोडू नका, दिव्यांची आरास करा! – राज्य सरकारचे आवाहन’ हे वृत्त (‘सामना’ 6 नोव्हेंबर) वाचले. आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्य सरकारने जनतेला फटाके फोडू नका, हे केलेले आवाहन योग्यच आहे. यासंदर्भात एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, टाळेबंदीच्या काळात गेले सहा-सात महिने दळणवळणाची सर्व साधने बंद होती. रस्त्यांवर गाडय़ा अजिबात नसल्याकारणाने प्रदूषणाचे प्रमाण झपाटय़ाने खाली आले होते. त्यामुळे लोकांना मोकळा श्वास घेता येत होता, पण कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर सरकारने हळूहळू एकेका गोष्टीवरील निर्बंध उठवण्यास सुरुवात केली. आता परिस्थिती अशी आहे की, वाहने पुन्हा पूर्ववत रस्त्यावर धावू लागल्याने धूळ, धूर तसेच वाहनांनी सोडलेला विषारी वायू यामुळे आधीच लोकांना श्वसन संस्थेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात पुन्हा कोरोनाची साथ जोडीला आहेच. यामध्ये तोंडावर मास्क बांधावा लागत असल्याने लोकांची अवस्था जीव घुसमटल्यासारखी झाली आहे, पण त्याला नाइलाज आहे. आता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे, परंतु अशा वेळेस कोरोनाची सध्याची स्थिती पाहता लोकांनी फटाके उडवून दिवाळी साजरी न करण्यामध्ये सर्वांचे हित आहे. कारण मुळातच वाहनांनी केलेले प्रदूषण आणि त्याच जोडीला फटाक्यांच्या विषारी दारूमुळे हवा प्रदूषित होते. म्हणूनच कोरोनासारख्या रोगात जो विषाणू थेट माणसाच्या श्वसन संस्थेवर आघात करतो त्याला आणखी इतर प्रदूषणाची जोड मिळता कामा नये. नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, कोरोनाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले असले तरी या देशातून कोरोना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क बांधणे, दोन व्यक्तींमध्ये योग्य ते अंतर राखणे तसेच वारंवार सॅनिटायझरने हात धुणे, हे नियम पाळलेच पाहिजेत. नाहीतर लोकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे फ्रान्स, रशिया, ब्रिटन या देशांमध्ये कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आल्यामुळे त्यांना नाइलाजाने टाळेबंदी जाहीर करावी लागली आहे. तशी वेळ आपल्या देशावर येऊ नये आणि ते आपल्याला परवडणारेदेखील नाही. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.




























































