प्रभू वैद्यनाथ मंदिराचं दारं उघडलं! श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून चोख व्यवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
parli-vaijnath-temple

परळी वैद्यनाथ – देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेलेल्या श्री वैद्यनाथ मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च 2019 पासून बंद करण्यात आले होते. मंदिरात भक्तांचा प्रवेश मज्जाव करण्यात आला होता, मात्र प्रभूंच्या नित्य षोडशोपचार पूजा कोरोना संकटकाळात विधिवत सुरूच होत्या. महाशिवरात्री नंतर आता प्रभू वैद्यनाथचे दर्शन होणार आहे. प्रवेशासाठी भाविकांना मास्क सक्तीचे असणार आहे.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वच मंदिरे उघडणार असून यासाठी त्या त्या देवस्थान ट्रस्ट कडून तयारी पूर्ण झाली आहे. वैद्यनाथ मंदिर आज सोमवार दि.16 नोव्हेंबर सकाळी 5 वाजता उघडण्यात येणार असून भाविकांना प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेता येणार आहे. कोरोनामुळे जवळपास 9 महिन्यानंतर मंदिराचे दारे उघडण्यात येणार असल्याने होणारी गर्दी लक्षात घेत देवस्थान कडून सुरक्षित ते सर्व खबरदारी घेतली जात आहे.

सोशल डिस्टनसिंगचे पालन सर्व भक्तांकडून केले जावे यासाठी मंदिरात मार्किंग करण्यात आलेली आहे. एरव्ही महाशिवरात्री, श्रावण महिन्यात उत्तर पायऱ्यांवर असलेली बॅरिकेटिंग आता विशेष बाब म्हणून करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याची माहिती श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. कोरोना संकटकानंतर मंदिर सुरू होत असल्याने प्रत्येक भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळी 5 पासून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला सुरुवात

आज सोमवार पासून वैद्यनाथाच्या दर्शनाला सुरुवात होणार असून आता भक्तांना केवळ मुख दर्शन करण्याचीच परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मंदिर प्रवेशासाठी भाविकांना मास्क सक्तीचे असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांना स्पर्श दर्शनाला मनाई करण्यात आली असून बेल फुलही अर्पण करता येणार नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत भक्तांना अभिषेकही करता येणार नाही.