धक्कादायक….सुरक्षा रक्षकावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या मालकाच्या गाडीवर लघुशंका करू नको, असे सांगणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. इंटरप्रायझेस या कंपनीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

भगवान शंकर वायफळकर (वय 41, रा. दत्तनगर, चिंचवड) असे या घटनेत गंभीर भाजलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महेंद्र बाळू कदम (वय 31, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वायफळकर हे भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. इंटरप्रायझेस या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आरोपी कदम एस. व्ही. इंटरप्रायझेस कंपनीच्या मालकाच्या गाडीवर लघुशंका करीत होता. त्याला वायफळकर यांनी रोखले आणि येथे लघुशंका करू नको, असे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या कदमने वायफळकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळले. या घटनेत वायफळकर गंभीररित्या भाजले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गिरनार याबाबत अधिक तपास करीत आहेत.