साईबाबा संस्थानने आस्थापनेवरील कायम कंत्राटी कामगारांच्या सेवा पुन्हा कंत्राटदाराकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 महिन्यांपूर्वी संस्थान सेवेत कायम केलेल्या 598 कामगारांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये 1 नोव्हेंबरपासून या कर्मचाऱयांना कायम कंत्राटी म्हणून दिलेला पूर्वीचा नियुक्ती आदेश रद्द करण्यात आला आहे. तसेच या दिवसापासून या कामगारांच्या सेवा पुन्हा नियुक्तीपूर्वी असलेल्या ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. या आदेशाने कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.
साईबाबा संस्थानमध्ये गेल्या 16 ते 20 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया कामगारांना मागील व्यवस्थापनाने संस्थान सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शासनाने मान्यता दिली होती. त्यानुसार गेल्या जानेवारीत या 598 कामगारांना संस्थान सेवेत घेण्यात आले, मात्र या कामगारांचा आनंद अल्पकाळच टिकला आहे. साई संस्थानच्या तदर्थ समितीने या कामगारांना पुन्हा ठेकेदाराकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेली अनेक वर्षे कंत्राटी म्हणून सेवा केली. संस्थान सेवेत आल्याने जीवनात स्थिरता येईल असे वाटत असतानाच संस्थानने घेतलेला हा निर्णय आमच्यासाठी मोठा आघात आहे. संस्थानने आमच्यावर केलेला अन्याय उच्च न्यायालयात नक्कीच दूर होईल, अशी आशा कर्मचाऱयांनी व्यक्त केली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच संस्थानचा आदेश
गेले चार-पाच महिने समितीच्या बैठकीत यावर अनेकदा चर्चा झाली. याबाबत कामगारांनी अनेकदा व्यवस्थापनाकडे साकडे घालूनही त्यावर तोडगा निघाला नाही. अखेर कामगारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र तेथे काही निर्णय होण्यापूर्वीच संस्थानने या कामगारांना पुन्हा कंत्राटदाराकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांना धक्का बसला आहे.