बड्या अर्थव्यवस्थांची एकजूटच जगाला महामारीतून सावरेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारी ही दुसऱया जागतिक महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान आहे, मानवतेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण वळण आहे. बडय़ा अर्थव्यवस्थांची एकजूटच जगाला या महामारीतून सावरू शकेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जी-20 शिखर परिषदेत व्यक्त केले. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी बडय़ा देशांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दोनदिवसीय जी-20 शिखर परिषदेत सदस्य देशांचे प्रमुख व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले. सौदी अरेबियाचे किंग सलमान यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मोदींनी जगाला महामारीतून सावरण्याच्या हेतूने महत्त्वपूर्ण विचार मांडले. महामारीवरील चर्चेत अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. जी-20 समूहातील सदस्य देशांच्या नेत्यांशी अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त चर्चा झाली. व्हर्च्युअल परिषदेचे आयोजन केल्याबद्दल सौदी अरेबियाला धन्यवाद दिले, असे ट्विट मोदींनी शिखर परिषदेतील चर्चा संपल्यानंतर केले. 20 वर्षांत पहिल्यांदाच ही परिषद व्हर्च्युअल पार पडली. 2022 मध्ये होणाऱया परिषदेचे यजमानपद हिंदुस्थानकडे असणार आहे.

नव्या वैश्विक सूचकांकसाठी पंचसूत्री!

मोदींनी कोरोना महामारीनंतरच्या जगासाठी नवीन वैश्विक सूचकांक तयार करण्याचीही सूचना केली. प्रतिभाशाली लोकांचा पूल बनवणे, तंत्रज्ञानाचा चांगला वापर, समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचणे, सरकारी यंत्रणेत पारदर्शकता, धरतीमातेप्रति आपल्या कर्तव्यांचे योग्य पद्धतीने पालन करणे हे पाच उपाय त्यांनी महामारीनंतर जगाची नव्याने सुरुवात करण्यासाठी सुचवले.

चीनकडून शांततेचा दिखावा

हिंदुस्थानशी वैर पत्करलेल्या चीनने जी-20 शिखर परिषदेत शांततेचा दिखावा केला. सीमावादावर शांततेने तोडगा काढला पाहिजे, चीन वैश्विक शांततेसाठी सदैव प्रयत्न करत राहील आणि वैश्विक व्यवस्था बनवण्यासाठी सहकार्य करेल, असे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सांगितले. मोदींनी जी-20 च्या प्रभावी कामकाजासाठी हिंदुस्थानच्या माहिती-तंत्रज्ञान तज्ञांचे योगदान देण्याची तयारी दाखवली.