कश्मीरच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाक गोळीबारात दोन जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीर सीमेवर पाकिस्तानी लष्कराने थैमान घातले आहे. गुरुवारी शहीद झालेल्या दोन जवानांचे अजून अंत्यसंस्कारही झाले नाहीत तोच शुक्रवारी राजौरी जिल्हय़ात सुंदरबनी सेक्टरमध्ये पाक लष्कराने केलेल्या तुफान गोळीबारात दोन जवान शहीद झाले.

जम्मू-कश्मीरातून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यातच लष्कराने ‘ऑपरेशन ऑल आऊट’च्या माध्यमातून अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले. गेल्या सहा महिन्यांत या मोहिमेत जवळपास 300 अतिरेकी मारले गेले. गुरुवारी शिपाई यश देशमुख व रतन सिंग हे दोन जवान खुशीपोरा चौकीवर शहीद झाले.

राजौरी जिल्हय़ात सुंदरबनी सेक्टरमध्ये पाक लष्कराने हिंदुस्थानी चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात नायक प्रेम बहादूर खत्री व रायफलमॅन सुखबीर सिंह हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना दोघांचे निधन झाले.

पाकिस्तानी लष्कर शस्त्रसंधीच्या चिंधडय़ा उडवीत सीमेवर गोळीबार करत आहे. पूंछ, किरनी, कस्बा, शाहपूर सेक्टरमध्ये गोळीबार करत आहे. काही ठिकाणी पाकिस्तानी लष्कराने उखळी तोफांचा जोरदार मारा केला. डिगवार, मालती व दल्लन सेक्टरमध्येही पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केल्याचे वृत्त आहे.