इंजिनीअरिंगची परीक्षा पुढे ढकला, उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांकडे युवा सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिप्लोमानंतर इंजिनीअरिंगच्या थेट दुसऱया वर्षांची प्रवेश प्रक्रिया अद्याप राबविण्यात आलेली नाही. त्यातच मुंबई विद्यापीठाने इंजिनीअरिंगच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्याने या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्वांची गंभीर दखल घेत युवा सेनेने थेट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया राबविण्याची आणि परीक्षा पुढे ढकलण्याची सूचना उदय सामंत यांनी केल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दहावीनंतर तीन वर्षे इंजिनीअरिंग डिप्लोमा शिक्षण घेतल्यानंतर इंजिनीअरिंग पदवी शिक्षणासाठी थेट दुसऱया वर्षाला प्रवेश देण्यात येतो. मात्र यंदा ही प्रवेश प्रक्रियाच अद्याप जाहीर झालेली नाही. यासाठी एकूण जागांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा नियम आहे. आधीच प्रवेशासाठी चुरस त्यात अद्याप प्रवेश प्रक्रिया जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांवर ताण येऊ लागला आहे. यातच द्वितीय वर्ष पदवी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया कधी होईल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत युवासेनेचे प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. तसेच या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी मागणी केली. यावेळी सामंत यांनी तातडीने तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांच्याशी संपर्प साधून ही प्रवेश प्रक्रिया लवकर जाहीर करावी तसेच ज्या विद्यापीठांनी द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगरच्या सत्र परीक्षा जाहीर केल्या आहेत त्यांना त्या परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश द्यावेत अशा सूचना दिल्याचे सावंत यांनी सांगितले.