पुण्यात पीडित बालकांसाठी ‘बालस्नेही कक्ष’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील अल्पवयीन आणि पीडित बालकांना विश्वास देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात ‘बालस्नेही कक्षा’चे उद्घाटन करण्यात आले आहे. आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते कक्षाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना करंदीकर म्हणाले, पीडित आणि अल्पवयीन बालकांना विश्वास देण्यासह त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम ‘बालस्नेही कक्षा’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांचा उपक्रम प्रशंसनीय असून, अनेकांकडून याची दखल घेतली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात बालकांची संख्या मोठी असून, बालविवाह, त्यांच्यावरील अत्याचार, अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे विचारात घेऊन ‘होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशन’ संस्थेकडून काम करण्यात येत असल्याचे संस्थेच्या संचालिका पॅरोलीन अडोर यांनी नमूद केले.

याप्रंगी बोलताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, बालकांबरोबर महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच सामान्यांना विश्वास देण्याचे काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे, कक्ष समन्वयक पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण उपस्थित होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आभार मानले.

z राज्यातील पोलीस ठाण्यांतंर्गत पहिलाच उपक्रम
पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन ‘बालस्नेही कक्षा’ची स्थापना केली आहे. त्यामुळे बालकांच्या तक्रारींचे निराकरण, गंभीर गुह्यांत सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्याशिवाय बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यातील ‘बालस्नेही’ उपक्रम पहिलांदा पुण्यात राबविण्यात येत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ‘बालस्नेही कक्षा’ची संकल्पना ही बालहक्क संरक्षण कायदा-2015, तसेच ‘नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट’ यांनी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यरत करण्यात आली आहे. ‘बालस्नेही कक्षा’च्या भिंती विविध कलापृतींनी रंगविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खेळणी, खुर्च्या-टेबल आणि पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत.