ठाणे, पालघर, रायगडातील हजारो नौका किनाऱयावरच, मतलई वाऱयांनी बिघडवले म्हावरं खवय्यांचे बजेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीच्या मोसमात पहाटेच्या सुमारास वाहणाऱया मतलई वाऱयांनी म्हावरं खवय्यांचे बजेट साफ बिघडवले आहे. या मतलई वाऱयांमुळे दुपारनंतरही जाल्यात मासली गावत नसल्याने ठाणे, पालघर, रायगडातील हजारो मच्छीमार नौका किनाऱयावरच नांगर टाकून बसल्या आहेत. त्यामुळे हलवा, पापलेट, घोळ, कोळंबी, बांगडय़ाचे भाव कडाडले असून आठवडय़ातून पाच दिवस मच्छीवर ताव मारणाऱया अस्सल खवय्यांच्या खिशाला मात्र चाट बसत आहे.

कोरोनाच्या संकटानंतर यंदाची मासेमारी सुरू झाली. परंतु ऑक्टोबरपर्यंत वातावरण बदलाचा फटका बसला होता. नोव्हेंबर महिना मच्छीमारीसाठी चांगला जाईल, अशी अपेक्षा असताना आता मतलई वाऱयांच्या मोसमामुळे जाळय़ात मासळी गावेना झाली आहे, मासळीच मिळत नसेल तर समुद्रात बोटी लोटून त्याचा खर्च निघणार कसा, त्यामुळे म्हावरं चढय़ा भावाने विकावे लागत असल्याचे पालघर-दांडी येथील मच्छीमार नथुराम कोळी यांनी सांगितले.

पाण्याला करंट…
मतलईच्या वेगवान वाऱयांमुळे समुद्रातील पाण्याला करंट बसतो. त्यामुळे किनारा परिसरात असलेली मासळी खोल समुद्रात जाते. यातच या वाऱयांमुळे दुपारपर्यंत समुद्राचे पाणी अस्थिर राहात असल्याने खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नसल्याने ठाण्यातील उत्तन, पालघरमधील वाढवण, उच्छेळी, दांडी, डहाणू तर रायगडमधील उरण, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनमधील हजारो मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या केल्या आहेत. परिणामी मासेमारीअभावी तुटवडा निर्माण झाल्याने मासळीचे भाव कडाडले आहेत. सरंगा, सुरमई, पापलेट, हलवा, बांगडय़ाला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे किलोभर मासळी घेणारे अर्ध्या किलोवर आले आहेत आणि ज्यांना परवडत नाही त्यांना बाजारात गेल्यानंतर केवळ टोपलीत डोकावण्यावर समाधान मानावे लागत आहे.

मतलई वाऱयांमुळे निर्माण झालेल्या खराब हवामानाचा मच्छीमारीवर विपरीत परिणाम झाला आहे. समुद्रातील मासळीचे प्रमाण घटले आहे. खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी येणारा साडेतीन लाखांचा खर्चही वसूल होत नाही. पदरचे पैसे घालून ते मिळत नसल्याने मच्छीमार आर्थिक संकटात आहेत. शेकडो मच्छीमारांनी बोटी विविध बंदराच नांगरून ठेवल्या आहेत. – भालचंद्र कोळी, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्था, उरण

आधीच कोरोना महामारीमुळे माशांना कमी मागणी आहे. त्यातच आता मतलई वाऱयाच्या फटक्यामुळे मासळी मिळेनाशी झाल्याने मच्छिमारांनी बोटी किनाऱयावरच नांगरून ठेवल्या आहेत. जे मासेमारी करत आहेत, त्यांच्यासमोर खर्चाची मिळवणी करण्यासाठी म्हावऱयाचे भाव वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
– राजन मेहेर, उपाध्यक्ष मच्छीमार कृती समिती, पालघर