हायब्रीड ॲनिमिटी योजनेत बोगस ठेकेदार; भाजपच्या सर्व कुंडल्या आमच्याकडे – विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपाच्या अनेक कुंडल्या आमच्याकडे आहेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी हायब्रीड ॲनिमिटी योजनेत 10 हजार कोटींची खिरापत ठेकेदारांना वाटली. हे सगळे बोगस ठेकेदार होते.नाशिकच्या एक फ्लॅटच्या पत्त्यावर पाच कंपन्या स्थापन झाल्या होत्या, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला.

खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले की, भाजपाने केलेले अनेक भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत. त्यात नारायण राणे यांचे जुहू येथील घर,नितेश राणे यांचे मनी लॉंड्रिगचे प्रकरण,भिवंडीतील जमीन खरेदी घोटाळा, सिंधुदुर्गातील घोटाळे आम्ही बाहेर काढणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष रहाणार. कोविडच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वखालील सरकारने सक्षमपणे उपाययोजना केल्यामुळे राज्यात कोरोना नियंत्रणात आहे. कोरोनाच्या आधी राज्यात फक्त दोन आरटीपीसीआर प्रयोगशाळा होत्या, त्या प्रयोगशाळांची संख्या 92 वर पोहचली आहे.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही प्रयोगशाळा सुरू झाल्या, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. निसर्ग चक्रीवादळातील नुकसान भरपाईचे निकष पहिल्यांदा महाविकासआघाडीने बदलले म्हणून घरांसाठी 90 हजारांऐवजी दीड लाखांची मदत देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात विकास करण्यात येणार असून बीच शॅक्समुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे राऊत म्हणाले. यावेळी शिवसेनेचे रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक,जिल्हाप्रमुख विलास चाळके,जि.प.अध्यक्ष रोहन बने,तालुकाप्रमुख प्रदीप साळवी,शहरप्रमुख बिपीन बंदरकर,बांधकाम सभापती महेश म्हाप आदी उपस्थित होते.