
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या दररोज ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या तीन हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे.
आता पूर्वीप्रमाणे सकाळी 6 ते 7 या वेळात पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना ऑनलाइन बुकिंग न करता दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. 5 डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली.
कोरोनामुळे आठ महिने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. शासनाने 16 नोव्हेंबरपासून मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला.
तेव्हापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग केलेल्या भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. प्रारंभी 1 हजार, त्यानंतर त्यात वाढ करून 2 हजार करण्यात आले. आता दिवसभरात 3 हजार भाविकांना मुखदर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे.
पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना पूर्वी दररोज सकाळी 6 ते 7 या वेळात ऑनलाइन बुकिंग केले नसले तरी मंदिरात प्रवेश दिला जात असे. आता 5 डिसेंबरपासून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
संबंधित नागरिकांना स्थानिक नागरिक असल्याविषयी आधार कार्ड अथवा मतदान कार्ड दाखवावे लागणार आहे. दररोज सकाळी 10 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 5 या वेळेव्यतिरिक्त सकाळी 7 ते रात्री 10 या वेळात प्रत्येक तासाला दर्शनाचे ऑनलाइन बुकिंग करून आलेल्या 250 लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
65 वर्षांपुढील नागरिक आणि 10 वर्षांच्या आतील मुले-मुली तसेच गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंदिर समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


























































