
गाव व्यसनमुक्त होण्यासाठी अनेकजण पुढाकार घेतात. सामाजिक संस्था जनजागृतीसाठी मोहीमा हाती घेतात. मात्र, आपले गाव व्यसनमुक्त झाले पाहिजे, यासाठी किर्तनकार हभप ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी अनोखा संकल्प केला होता. आता गाव व्यसनमुक्त झाल्याने त्यांनी त्यांचा नवस फेडला आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेलूद गाव व्यसनमुक्त होण्यासाठी किर्तनकार हभप ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांनी राजुरेश्वराच्या चरणी नवस केला होता. आपले गाव व्यसनमुक्त झाले तर आपल्या गावापासून राजूरपर्यंत दंडवत घालत येईल आणि दर्शन घेईल, असा नवस त्यांनी केला होता. आता गाव व्यसनमुक्त झाल्याने त्यांनी आपल्या गावापासून राजूरपर्यंतचे 60 किलोमीटरचे अंतर दंडवत घालत पार केले आणि राजूरेश्वराचे दर्शन घेऊन नवस फेडला आहे.
हा नवस फेडताना त्यांच्यासोबत हभप विष्णु महाराज सास्ते, हभप एकनाथ महाराज राजूरकर, कैलास ढमाले, रामेश्वर गव्हाणे आदी या यात्रेत सहभागी झाले होते. अलीकडच्या काळात कमी वयात मुले विविध व्यसनांच्या आहारी गेले आहेत. व्यनाधीनतेमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे तर काहींचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या पिढीला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी राजुरेश्वराला नवस केल्याचे शेलुदकर यांची सांगितले. आपला संकल्प पूर्ण झाला असून गाव व्यसनमुक्त झाल्याने आपण आपला नवस फेडल्याचे त्यांनी सांगितले. शेलुद येथे व्यसन मुक्तिकेंद्रातर्फे व्यसनाधीन तरुणांना व्यसनमुक्त होण्यासाठी केंद्र चालवले जात आहे. या केंद्रातून अनेक तरुण व्यसनमुक्त झाले आहेत.
























































