
जगासह देशभरातील विविध रुग्णालयांत कोरोनावरील तिसरी आणि अंतिम लसीची मानवी चाचणी सुरू असून लवकरच कोरोना लस बाजारात येणार आहे. या लसींची साठवणूक करण्यासाठी कांजुरमार्गमध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज सेंटर तयार केले जात असून त्याचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या महत्त्वाच्या कामाची पाहणी आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आणि कामाचा आढावा घेतला.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार अहोरात्र मेहनत घेत असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. त्याचबरोबरीने कोरोनाच्या लसी साठवण्यासाठी कांजुरमार्ग पूर्व येथे पालिका इमारतीत कोल्ड स्टोरेज सेंटर तयार करण्यात येत आहे. या जागेची महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, नगरसेविका सुवर्णा करंजे, नगरसेवक अमेय घोले, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, डॉ. अविनाश अंपुश, डॉ. राजूसिंह राठोड आदी उपस्थित होते.
कोल्ड स्टोरेजची रचना अशी असेल
– कोल्ड स्टोरेज पाच मजली उभारण्यात येणार असून त्यातील तीन मजले हे कोल्ड स्टोरेज पेंद्रासाठी आहेत.
– बाहेरील वातावरणाचा लसींवर पुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये यासाठी अधिक 2 डिग्री सेल्सियस ते अधिक 8 डिग्री सेल्सिअस तपमान राखत असलेले 40 क्युबिक मीटरचे दोन उपकरणे (वॉक इन पुलर्स) बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच उणे 15 डिग्री सेल्सिअस ते उणे 25 डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले 20 क्युबिक मीटरचे (वॉक इन फ्रिझर) बसवण्यात येणार आहे.
– सेंटर सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठय़ावर चालवण्यात येणार असल्याने विजेची बचत होणार आहे.
























































