शहरी वनीकरण, झाडांचे संगोपन, उद्यानांचा विकास, वृक्ष प्राधिकरणात 402 कोटींचा अंदाजित अर्थसंकल्प मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबईत शहरी वनीकरण, झाडांचे संगोपन, उद्यानांचा विकास करून शहरात जास्तीत जास्त हिरवाई निर्माण करणारा वृक्षप्राधिकरणाचा 402 कोटी रुपयांचा अंदाजित अर्थसंकल्प मंजूर करण्यात झाला आहे. यामुळे मुंबईत झाडांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संवर्धन अधिनियम 1975 च्या प्रकरण सहाच्या कलम 16 अन्वये प्रत्येक महापालिकेचा वृक्ष प्राधिकरणाचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. शहरांमध्ये झाडांची संख्या वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या नियोजित अर्थसंकल्प मांडण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. वर्ष 2021- 22 करिता 402,34,86,000 इतका अंदाजित अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अंदाजित अर्थसंकल्पाला आयुक्तांच्या मंजुरीनंतर पालिकेच्या आगामी मूळ अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तरतुदी

z वृक्षप्राधिकरण – 14 कोटी, पालिका आयुक्तांचे कार्यालय – 41 कोटी, सुरक्षा – 33 कोटी, विधी – 5 कोटी, वित्त, कोषागार आणि लेखा – 23 कोटी, शहरी वनीकरण – 300 कोटी, वृक्षांचे संरक्षण – 611 कोटी, वृक्षांचे परिरक्षण – 1017 कोटी, नवीन वृक्षांची लागवड – 52कोटी, रोपवाटीकेचा विकास – 218 कोटी, प्रसिध्दी व उद्यानविषयक प्रदर्शन – 117 कोटी, क्षेपणभूमीतील वृक्षांची देखभाल व नवीन वृक्षांची लागवड 405 कोटी, मालमत्ता कर – 396 कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे.