
माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्यास मंगळवारी (दि.8) धार्मिक परंपरा जपत हरिनाम गजरात सुरुवात झाली असल्याची माहिती आळंदी संस्थांचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी दिली. या वर्षी कोरोंना संकट असल्याने सुरक्षित वारीला प्राधान्य देऊन शासनाने मर्यादित भाविकांच्या हजेरीत सोहळ्यास परवानगी देऊन आळंदी पंचक्रोशीत रविवार (दि.6) पासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आळंदी पंचक्रोशीमध्ये आस्थापना बंद ठेवल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत.
कोरोंना संकट काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आळंदी यात्रा फार गर्दी न करता साजरी करण्याचे आहेत. माऊली मंदिरातील धार्मिक कार्यक्रम 8 ते 14 डिसेंबर या यात्रा काळात मर्यादित भाविकांच्या हरिनाम गजरात होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी सांगितले आहे .रविवारी (दि.6)परंपरेने विना मंडपात कीर्तन झाले. मुक्ताबाई फड पंढरपूर यांच्या वतीने सेवा देण्यात आली. सोमवारी (दि.7) परंपरेने बापूसाहेब ठाकुर यांच्या तर्फे कीर्तन होणार आहे.
मंगळवारी (दि.8) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 724 व्या संजीवन समाधी सोहळ्यास श्रीगुरू हैबतरावबाबा यांचे पायरी पूजनाने सुरुवात होत आहे. पायरी पूजनानंतर साडेसहा वाजता विना मंडपात योगिराज महाराज ठाकुर यांच्या तर्फे कीर्तन सेवा होत आहे. रात्री 9 वाजता बाबासाहेब महाराज आजरेकर फड पंढरपूर यांचे तर्फे कीर्तन,हैबतराव बाबा यांचे पायरी पुढे परंपरेची जागर सेवा होणार आहे.येत्या 11 डिसेंबर रोजी आळंदीत कार्तिकी यात्रा व त्या नंतर 13 डिसेंबर ला संजीवन समाधी दिन साजरा होणार आहे.
आळंदी यात्रेला भाविकांची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी बाबतची जागृती आळंदी नगरपरिषद , आळंदी पोलिसांनी शासनाच्या सूचना प्रमाणे केली. नागरिक, व्यापारी यांनी आपल्या आस्थापना बंद ठेवत प्रतिसाद दिला. आळंदीत या संचारबंदीला प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांनी देखील आरोग्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले. येथील माऊली मंदिरावर यावर्षी लक्षवेधी विद्युत रोषणाई दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते संतोष वाळके यांनी केली आहे. यामुळे मंदिर परिसर लक्षवेधी झाला आहे.
यात्रे वेळी मोठी गर्दी आळंदीत होत असते . गर्दी कमी करण्यासह आळंदीतील नागरिकांचे आरोग्य कायम राहावे यासाठी सुरक्षिततेचा विचार करून शासनाने अत्यंत आवश्यक असा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी अविनाश बोरुंदीया यांनी सांगितले. यात कामकाज करताना मात्र नाहक कोणास वेठीस धरू नये, लोकांनीही प्रशासनाला मदत करणे आवश्यक आहे, आणि थोड्या मवाळ भुमिकेतून प्रश्न शासनाने हाताळायला हवा, या गोष्टीचा त्रास कोणालाच होऊ नये व योग्य त्या पद्धतीने हा सोहळा शांत पणे पार पडावा हीच आम्हा ग्रामस्थांची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया बोरुंदिया यांनी दिली आहे. यावर्षी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत कार्तिकीचा सोहळा होत आहे. शासनाचे अटी शर्ती मात्र पाळणे बंधनकारक असल्याने पोलिस ,महसूल व आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान प्रशासनाने यासाठी कामकाज सुरू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता आळंदी व पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आल्याने सर्वत्र शांतता व आस्थापना बंद होत्या.





























































