आयडिया केली, पण अंगाशी आली; प्रतिस्पर्धकाला फसविण्याचा डाव पोलिसांमुळे उलटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केबल व्यवसायातील वाद आणि एका हत्येच्या गुह्यात पोलिसांना सीसीटीव्हीचे फुटेज दिले म्हणून आपल्यावर गोळीबार झाल्याची तक्रार देऊन प्रतिस्पर्धकांना लटकवण्याची आयडिया फिर्यादीने केली, पण पोलिसांनी केलेल्या अचूक तपासामुळे तक्रारदारच लटकला.

मानखुर्दच्या मोहिते पाटील नगरात राहणारा राजेश ठाकूर याने त्याच्यावर गोळीबार झाल्याची तक्रार देऊन दुसरे केबल व्यावसायिक विवेक आणि आकाश यादव तसेच योगेश हलवाई यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यामुळे मानखुर्द पोलीस ठाण्याचे एपीआय अर्जुन कुडले व पथकाने विवेक, आकाश आणि योगेश यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिघांचेही घटना घडली त्यावेळचे लोकेशन पोलिसांनी काढले, तर तिघेही त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी होते असे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी राजेशला ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याची बोबडी वळली. त्या तिघांनी काहीही केलेले नसून त्यांना लटकवण्यासाठी माझ्यावर त्यांनी गोळीबार केल्याचा खोटा डाव आखला होता. त्यासाठी मुलगा आणि पत्नीची मदत घेतल्याचे राजेशने कबूल केले. पोलिसांनी राजेश, त्याचा मुलगा आणि पत्नीला अटक केली.

लाईट गेली अन् सीसीटीव्ही बंद पडला

आपली तक्रार खरी वाटावी आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी राजेशने जबरदस्त डोके लावले होते. तो घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर फैऱ्या मारतोय आणि तेव्हाच नेमकी लाईट जाऊन सीसीटीव्ही बंद पडतो अशी आयडिया त्याने केली, पण एवढी आयडिया करूनही पोलिसांनी त्याचे पितळ उघड पाडले आणि व्यवसायातील स्पर्धेतून प्रतिस्पर्धकांना लटकवण्याचा आटापिटा करणारा राजेश स्वतः गजाआड गेला.