
टॉप्स ग्रुपने एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कथित घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमित चांदोले यांना सत्र न्यायालयाने 9 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
अमित चांदोले यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन कोठडीऐवजी ईडी कोठडीत त्यांची रवानगी करण्यात यावी अशी मागणी ईडीच्या वतीने सत्र न्यायालयात करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने त्यास नकार दिल्याने ईडीने सत्र न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आज याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्तींनी ईडीचा हा दावा मान्य करत सत्र न्यायालयाने दिलेला न्यायालयीन कोठडीचा आदेश रद्द केला व विशेष पीएमएलए कोर्टाला तातडीने यावर निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार सत्र न्यायालयाने अमित चांदोले यांना न्यायालयीन कोठडीऐवजी 9 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली.
























































