
सिन्नर तालुक्यातील नळवाडी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी सकाळी बिबट्याची मादी अडकली. गेल्या अनेक दिवसांपासून या शिवारात बिबट्याचा वावर असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता बिबट्याला पकड्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नळवाडी व परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. त्याने जनावरे फस्त केल्याच्या घटना घडत असल्याने 4-5 दिवसांपूर्वी नळवाडीच्या पांढरी वस्ती येथे अर्जुन मुरलीधर दराडे यांच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता. त्यात बिबट्याची मादी अडकल्याचे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती सिन्नर वनविभागाला कळवली.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, प्रभारी वनपाल के. आर. इरकर, वनरक्षक सीमा खांडेकर, रोहित लोणारे यांनी घटनास्थळी येऊन पिंजऱ्यासह या बिबट्याच्या मादीला मोहदरी वनउद्यानात आणले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने तिला नैर्सिगक अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी दिली.



























































