INDvsAUS – ‘सुपर’ संजू, हवेत सूर घेत अडवला षटकार; पहा Video

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू वाडे आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर 186 धावा केल्या. टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणाचाही ऑस्ट्रेलियाने फायदा उठवला. एकीकडे इतर खेळाडू खराब क्षेत्ररक्षण करत असताना संजू सॅमसन याने मात्र आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने सर्वांना अवाक केले.

संजू सॅमसन याने सीमारेषेवर हवेत सूर मारत षटकार वाचवला. संजूने झेल पकडला मात्र हजरजबाबीपणा दाखवत चेंडू आत फेकला. यामुळे फलंदाजाला फक्त 2 धावा घेता आल्या आणि संजूने 4 धावा वाचवल्या. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी संजूचे कौतुक केले आहे.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना 14 व्या षटकात हा प्रकार घडला. शार्दूल ठाकूर यांच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेल याने उत्तुंग फटका मारला. चेंडू षटकार जाणार असे वाटत असताना संजू सॅमसन नावाची भिंत आडवी आली. संजूने हवेत सूर मारत कॅच पकडला. मात्र आपण चेंडूसह सीमारेषेपार जात असल्याचे लक्षात येताच त्याने चेंडू आत फेकला आणि संघासाठी 4 धावा वाचवल्या.

सीमारेषेवर अफलातून क्षेत्ररक्षण करण्याची ही संजूची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. नेटकऱ्यांनी त्याचा फोटोही शेअर केला.