
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर कुटुंबीय घर बंद करून गेल्याची संधी चोरट्यांनी साधली आहे. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून दोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून 21 लाख 16 हजारांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना काल ढोले पाटील रस्त्यावरील सिंधुदत्त सोसायटीत घडली. याप्रकरणी शंतनू ढोले-पाटील (वय 39) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू कुटुंबीयांसह ढोले पाटील रस्त्यावरील सिंधुदत्त सोसायटीत राहायला आहे. त्यांचा संगीत साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरात पेस्टकंट्रोल केले होते. त्यामुळे ते घर बंद करून कुटुंबीयांसह दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, डायमंड असा 21 लाख 16 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रूपेश चाळके यांनी दिली आहे.























































