देवांच्या चांदीच्या मुखवट्यांसह दानपेटी पळवली, भालावली लक्ष्मीमाधव मंदिरात चोरट्यांचा डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील भालावली येथील श्री लक्ष्मी माधव मंदिरात चोरटयांनी गाभाऱ्याचे कुलुप तोडून चांदीच्या मुखवटयांसह दागिने असलेला पेटारा तसेच दानपेटी चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये तीन चांदीचे मुखवटे दोन सोन्याचा मुलामा दिलेल्या चांदीच्या साखळ्या असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज आणि दानपेटीतील रोखरक्कम आहे.

भालावली कोतापूर रस्त्यावर पिशदवाडी येथे हे श्री लक्ष्मी माधव मंदिर आहे. या मंदिरापासुन खुप दुरवर वस्ती असुन पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मंदिराच्या कुलुपाची चावी तेथेच बाजुला असलेल्या खुंटीला लावलेली असते. चोरीनंतर ती चावी ठेवलेल्या जागेवर नव्हती शिवाय कुलुपही गायब करण्यात आले होते. त्यामुळे त्या चावीच्या सहाय्याने कुलुप उघडुन चोरटयाने मंदिरात प्रवेश करुन चोरी केली असा कयास नाटे पोलीसांकडुन व्यक्त करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. मंदिराचे पुजारी रमाकांत पाध्ये हे नित्य पुजेसाठी मंदिरात आले असता त्यांना मंदिराचा गाभारा उघडा असल्याचे लक्षात आले. अधिक माहिती घेता गाभाऱ्यातील देवांचे मुखवटे व दागिने असलेला पेटारा जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तात्काळ देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिस पाटील सुर्यकांत सिनकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान अज्ञात चोरटयांनी चोरी केलेला लॉकर थोडया अंतरावर जंगलात आढळून आला आहे. त्यातील चांदीच्या मुर्ती व दागिने अज्ञातांनी घेवून पोबारा केला आहे. याप्रकरणी नाटे पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे करीत आहेत.