राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृत बांधकामाचे इमले, शंभरहून अधिक जणांना नोटिसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील साळवी स्टॉपपासून टीआरपी पर्यंतच्या परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. रातोरात ही बांधकामे उभी राहात असल्यामुळे या अनधिकृत बांधकामांच्या मागे नेमके कोण आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात गेलेल्या जमीनीवर बांधकामे करुन पाचपट मोबदला लाटण्याचा प्रयत्न काही भामटे करत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. अशा शंभरहून अधिकजणांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. ती बांधकामे तात्काळ हटवावीत अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन झाले असून महामार्गाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. रातोरात हे इमले उभे राहात आहेत. साळवीस्टॉपपासून पुढे टीआरपी परिसरात ही बांधकामे सुरु असून अनधिकृत बांधकामांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागानेही लक्ष वेधले असून शंभरहून अधिकजणांना नोटिसा पाठवल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावेळी ही बांधकामे हटवली जातील आणि आपल्याला पाचपट मोबदला मिळेल  असे मनसुबे काही मंडळींचे आहेत. मात्र ही बांधकामे कारवाईच्या कचाट्यात सापडली आहेत. नोटिसा पाठवल्यानंतर थोड्याच दिवसात या बांधकामांवर बुलडोझर फिरवला जाणार असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

इतरवेळी नियमातील बांधकामाच्या परवानगीसाठी चपला झिजवावे लागणारे स्थानिक प्रशासनाला रस्त्याच्या शेजारी होणारी अनधिकृत बांधकामे का दिसली नाहीत, मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असताना केणीही याविरोधात आवाज उठवला नाही किंवा चौकशी केली नाही. त्यामुळे बांधकाम करणाऱ्यांचे धाडस वाढले आणि रस्त्यांच्या दुतर्फा इमले उभे राहीले.