
नळाचे पाणी भरत असताना थोडे पाणी शेजाऱ्याच्या अंगणात गेल्यामुळे दोन शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. जुन्नर तालुक्यातील राळेगण जुन्नर गावात 8 डिसेंबरला ही घटना घडली आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवडाबाई रोहिदास उंडे आणि ज्ञानेश्वर रोहिदास उंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत दारकु उंडे (42) यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबरला तक्रारदार चंद्रकांत यांची मुलगी घरासमोरील अंगणात नळाचे पाणी भरत असताना त्यातील थोडे पाणी आरोपीच्या अंगणात गेले होते. यावरून आरोपीने तिला शिवीगाळ करत मारहाण केली होती. चंद्रकांत संध्याकाळी घरी परत आले असता त्यांच्या मुलीने हा सर्व त्यांच्या कानावर घातला. याचा जाब विचारण्यासाठी ते आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी आवडाबाईने जवळ पडलेला दगड उचलून चंद्रकांत यांच्या डोक्यात मारला. तर दुसरा आरोपी ज्ञानेश्वर उंडे याने त्यांना शिवीगाळ केली. जुन्नर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक युवराज मोहिते करीत आहेत.



























































