पाकिस्तानच्या 5 सैनिकांचा खात्मा; तिघे जखमी, हिंदुस्थानी लष्कराची दणकेबाज कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्कराने पूंछच्या एलओसीवर पाकिस्तानच्या पाच सैनिकांचा खात्मा केला. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी दुपारी सीमेवर जबरदस्त गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटेपर्यंत सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याने उभारलेले काही बंकर उद्ध्वस्त करण्यात आले. गोळीबारात पाकिस्तानचे आणखी तीन सैनिक जखमी झाले.

गेल्या काही दिवसांत एलओसीच्या काही भागांत पाकडय़ांकडून वारंवार पुरापती केल्या जात आहेत. गुरुवारी दुपारी पाकिस्तानी सैन्याने पुन्हा शस्त्रसंधी उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. तसेच मोर्टार गोळेही फेकले. नंतर रात्री पूंछ प्रांताला लक्ष्य केले. मानकोट प्रांतातही जोरदार गोळीबार केला. सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा कट होता. यातूनच त्यांनी नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले, असे लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला हिंदुस्थानी सुरक्षा दलांनी करारा जबाब दिला. गुरुवारी संपूर्ण रात्रभर दोन्ही दिशेने गोळीबार सुरू होता. शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गोळीबार थांबला. यात लष्कराने पाकिस्तानच्या पाच सैनिकांना ठार केले.

श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

श्रीनगरच्या नूरबाग परिसरात दहशतवाद्यांनी शुक्रवारी केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर ग्रेनेड हल्ला केला. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी हा हल्ला झाला. यात कोणतीही हानी झाली नसल्याचे सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी सांगितले.

पाकिस्तानने यंदा 3200 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे. यात 30 नागरिकांना प्राण गमवावा लागला, तर 100 हून अधिक नागरिक जखमी झाले. हिंदुस्थान व पाकिस्तानमध्ये 1999 साली शस्त्रसंधी उल्लंघनासंबंधी करार झाला होता.