‘शीतल’ औदुंबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सरिता विनय भावे

उष्णतेच्या विकारांवर उंबराच्या खोडाचे, मुळाचे काढलेले पाणी ‘अतिशीतल’ असल्याने लाभदायक असते, असे आयुर्वेदाचार्य मानतात. औदुंबर आसपास असल्यास जमिनीला पाणी लवकर लागते किंवा पाणी असलेल्या जागी औदुंबर शक्यतो असतोच अशी भाविकांची श्रद्धा असते आणि खूपदा त्याची प्रचीतीही येते.

औदुंबर’ शब्द उच्चारताक्षणी बालकवींच्या कवितेतील ‘…पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर’ ही ओळ आठवते (आणि ‘असला’ म्हणजे नेमका कसा, हा प्रश्नही मनात डोकावून जातो!). औदुंबराचे ‘उंबर’ असेही प्रसिद्ध नाव आहे आणि लगेच ‘उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला’ या ओळी आठवून, लहानपणी फू-फू करून ते किडे उडवून उंबराची फळे खाल्ल्याची गोड आठवणही जागृत होते. पाच देववृक्षांपैकी असणाऱया औदुंबराला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांच्या त्रिगुणांचे एकत्रित स्वरूप असणारे ‘श्रीदत्तात्रेय’ यांचे निवासस्थान मानले जाते. श्रीदत्तात्रेयांची विशेष म्हणून जी मोजकी स्थळे आहेत त्यापैकी एकाचे नावही ‘औदुंबर’ आहे. असे म्हणतात की, हिरण्यकश्यपूची आतडी नखांनी ओरबाडून काढल्यावर नरसिंह रूपातील श्रीविष्णूंच्या नखांची अतिशय जळजळ व्हायला लागली. तेव्हा महालक्ष्मीने त्यांना थंड वाटावे म्हणून नखे रोवण्यासाठी औदुंबराची फळे आणून दिली. ‘तयेवेळी शीतलार्थ, नखे रोवली औदुंबरात; विषाग्नि झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला’, असा गुरुचरित्राच्या 19 व्या अध्यायात उल्लेख आहे. सदाहरित असणाऱया या वृक्षाला हिंदीत ‘गुलर’ तर इंग्रजीत ‘क्लस्टर फिग’ असे नाव असून वनस्पतीशास्त्रात Ficus recemosa असे नामाभिधान आहे (‘अंजीर’ औदुंबराचा चुलतभाऊ आहे, बरं का!). उंबराची फुले कधीही दृष्टीस पडत नाहीत म्हणून दुर्मिळ गोष्टींना ‘उंबराच्या फुलाची’ उपमा दिली जाते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण गंमत म्हणजे उंबराच्या खोडाला छोटय़ा छोटय़ा गुच्छात लगडलेली लालहिरवी फळे खरी फळे नसून असंख्य फुलांचा एकाच आवरणात असणारा तो ‘पुष्पसमुदाय’च आहे. त्याला ‘औदुंबरक फळ’ अशी संज्ञा आहे. या छद्मफळात 3 प्रकारची फुले असतात – नरपुष्पे व लांब देठाची आणि छोटय़ा देठाची स्त्राrपुष्पे. फक्त एकाच विशिष्ट जातीच्या ‘फिगवास्प’ची मादी फळात प्रवेश करते आणि छोटय़ा देठाच्या स्त्राrपुष्पांत अंडी घालते. यावेळी तिने आधीच्या झाडावरून आणलेल्या नरपुष्पांचा मोठय़ा देठाच्या स्त्राrपुष्पांशी संपर्क घडून उंबराच्या फलनाची क्रिया होते. अंडय़ांतून आधी नर-कीटक बाहेर पडतात. ते मादी-कीटकांना फलित करून फळातून बाहेर पडण्यासाठी छिद्र तयार करतात. मादी-कीटके नरपुष्पे गोळा करून त्या छिद्रातून बाहेर पडून दुसऱया उंबराच्या झाडाच्या स्त्राrपुष्पांना फलित करण्यासाठी उडून जातात. या परागीभवनाच्या बदल्यात उंबराचे झाड/फूल त्या कीटकांचे पोषण आणि संरक्षण करते. कवीने जरी ‘किडेमकोडे’ म्हणून हिणवले असले तरी हे विशिष्ट कीटक आणि उंबराचे झाड यांच्यातील ‘परस्परसहजीवना’चा हा ऋणानुबंध शतकानुशतके टिकून आहे. एकाशिवाय दुसऱयाचे अस्तित्व शक्यच नाही असे थक्क करणारे अद्वैत असणारी, अतिशय गुंतागुंतीची ही नैसर्गिक प्रक्रिया अव्याहत चालू आहे.

गोवर, कांजिण्या, विविध मूत्रविकार, किडनी स्टोन यासारख्या उष्णतेच्या विकारांवर उंबराच्या खोडाचे, मुळाचे काढलेले पाणी ‘अतिशीतल’ असल्याने लाभदायक असते, असे आयुर्वेदाचार्य मानतात. औदुंबर आसपास असल्यास जमिनीला पाणी लवकर लागते किंवा पाणी असलेल्या जागी औदुंबर शक्यतो असतोच अशी भाविकांची श्रद्धा असते आणि खूपदा त्याची प्रचीतीही येते. (बघा, कवितेतही औदुंबर ‘जळात’ पाय टाकून बसला आहे!). उंबराचे लाकूड लवकर कुजत नाही म्हणून पूर्वी घराच्या पूर्ण चौकटीलाच उंबराचे लाकूड वापरत असत. यासाठीच आपण त्याला ‘उंबरा’ किंवा ‘उंबरठा’ असे संबोधतो. आपल्या घराच्या दारातच येऊन ठेपलेल्या या उंबराने मात्र शांतपणे ती चौकट ओलांडून आपल्या हृदयातच घर केले आहे.

– [email protected]