संगमनेरात लाचखोर पोलीस नाईक जेरबंद, नाशिकच्या पथकाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मिसिंग’च्या तक्रारीनंतर सापडलेल्या विवाहितेचा जबाब घेण्यासाठी तिच्या पतीकडून एक हजाराची लाच स्वीकारणाऱया पोलीस कर्मचाऱयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस नाईक बी. बी. देशमुख असे अटक केलेल्याचे नाव आहे.

संगमनेर शहरातील एका व्यक्तीची पत्नी घरातून निघून गेली होती. त्याबाबत तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रारही दाखल केली होती. त्याचा तपास बी. बी. देशमुख याच्याकडे होता. दरम्यान, ही विवाहिता आढळली असता, देशमुख याने या विवाहितेचा जवाब नोंदविण्यापूर्वी तिच्या पतीकडून एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी त्याच्याकडे पैसे नसल्याने आज सायंकाळी पैसे देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या दुसऱया मजल्यावर लाचेची रक्कम स्वीकारताना देशमुख याला पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.