
भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राष्ट्रहितासाठी क्षत्रियांनी जास्तित जास्त मुलं जन्माला घालावी, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी शुद्र समाजाबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप अडचणीत येणार आहे.
सिहोर येथे आयोजित एका कार्यक्रमात लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘आपल्या धर्मात चार वर्ण आहेत. क्षत्रियला क्षत्रिय म्हटलं तर वाईट नाही वाटत. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं की वाईट नाही वाटत. वैश्य़ला वैश्य म्हटलं की वाईट नाही वाटत. मात्र शूद्रला शुद्र म्हटलं की का वाईट वाटतं. कारण काय आहे? हा त्यांचा मुर्खपणा आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत बोलताना देखील त्या आक्षेपार्ह बरळल्या आहे. ”राष्ट्रहितासाठी क्षत्रिय समाजाने जास्तित जास्त मुलं जन्माला घालावी व त्या मुलांना लष्करात पाठवावे. क्षत्रिय़ वंश संपला तर देशाची रक्षा कोण करणार? त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी क्षत्रियांनी मुलं जन्माला घालायला हवीत. हा कायदा फक्त देशविरोधी कारवाया करणाऱ्यांसाठी लागू केला पाहिजे.’, असे साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले.
ममता बॅनर्जींना म्हटले पागल
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना प्रज्ञा ठाकूर यांनी ममता बॅनर्जींवर खालच्या भाषेत टीका केली आहे. ‘ममता बॅनर्जी पागल झाल्या आहेत. त्या पेटून उठल्या आहे. कारण त्यांना लक्षात आलंय की आता बंगालमध्ये हिंदूंचे सरकार येणार आहे. बंगाल अखंड हिंदुस्थानचे एक राज्य आहे. त्या त्यांना वेगळे करायाच प्रयत्न करत आहेत. मात्र भाजप असं होऊ देणार नाही’, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे.


























































