रत्नागिरी – साहित्यप्रेमींनी जागवल्या गदिमांच्या आठवणी, चिपळुणात साहित्यजागर उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शब्दप्रभू गदिमा, अर्थात ग.दि. माडगुळकर यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला 13 डिसेंबर रोजी सायंकाळी चिपळूण शहरातील वेस मारुती मंदिराच्या पारावर गदिमा साहित्यजागर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी साहित्यप्रेमींनी गदिमांच्या आठवणी जागवल्या. ज्येष्ठ कलाकार दादा कारेकर, ज्येष्ठ कीर्तनकार शरद तांबे, लोटिस्माचे विनायक ओक, महंमद झारे यांच्या हस्ते नटराजपुजन आणि गदिमांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

‘स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती’ या विजयालक्ष्मी भोसले यांनी सादर केलेल्या गीतरामायण गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माधवी भागवत यांनी ‘एक धागा सुखाचा’ हे गाणं सादर केले. चित्रम स्टुडिओचे संजय शिंदे यांनी आपल्या खास शैलीत गदिमांची ‘जोगीया’ कविता सादर केली. शरद तांबे यांनी रामजोशी सिनेमातील गदिमांनी लिहिलेला सवाल जवाब सादर केला. रामायणातील ‘राम जन्मला ग सखे’, ‘जेथे राघव तेथे सीता’, ‘फुले तोडीत, सेतू बांधा रे सागरी’ या प्रसिद्ध गीतांचा इतिहास मीरा पोतदार यांनी सांगितला. या गाण्यांची झलक स्मिता करंदीकर यांनी गाऊन दाखवली. सिनेरसिक प्रकाश सरदेसाई यांनी ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ हे गाणं गाऊन गदिमांसह काशिनाथ घाणेकर यांच्याही आठवणी जागवल्या.

माजी कामगार कल्याण अधिकारी रघुनाथ कासेकर यांनी ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’ या चुरगाळून टाकलेल्या परंतु नंतर पाहिल्या गेलेल्या कागदाच्या तीन बोळ्यांमधून जन्मलेल्या गीताच्या निर्मितीचा इतिहास उपस्थितांना सांगितला. गदिमांनी त्या त्या वयातील वस्त्रांची उपमा देहाच्या अवस्थांना दिली आहे. कार्यक्रमात रंगकर्मी ग्रुपचे दिलीप आंब्रे यांना कोकणचा शेतकरी लघुफिल्मला पारितोषिक मिळाल्याबद्दल प्रकाश घायाळकर, विनायक ओक, संतोष केतकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दोन तास चाललेल्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मंगेश बापट यांनी केले. कार्यक्रम आयोजक संस्था लोटिस्मा, मसाप, कोमसाप, रंगकर्मी ग्रुप, संस्कार भारती यांचे आभार मानण्यात आले.

साहित्य जागराच्या या ठिणगीतून गदिमांच्या स्मारकात त्यांच्या लेखनाचे दीप लागावेत आणि मराठी सारस्वत उजळून निघावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. समारोपाप्रसंगी भारतमातेला अभिवादन करणारी ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे’ ही गदिमांची प्रार्थना सामुहिकरीत्या म्हणण्यात आली. याची कल्पना धनंजय चितळे यांची होती. आनंद पाटणकर ,स्मिता करंदीकर, शरद तांबे यांनी स्वर दिला. रस्त्यावरील पादचारऱ्यांनीही थांबून प्रार्थना म्हटली. कार्यक्रमाच्या यशाौस्वतेसाठी प्रकाश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम दांडेकर, प्रकाश घायाळकर, विनायक ओक, दिलीप आंब्रे, अंजली बर्वे, शरद तांबे, मनिषा दामले, अरुण इंगवले, धीरज वाटेकर, उदय पोटे, संतोष केतकर यांनी परिश्रम घेतले.