
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, भाजपच्या वाचाळवीर नेत्यांमुळे हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने आंदोलन मोडून काढण्याची चूक करू नये; अन्यथा त्याची फार मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, ‘सरकारने लादलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आणि हमीभावाचा कायदा केल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा शेतकऱयांचा निर्धार आहे. दिल्लीत चारही बॉर्डरवर लाखांच्या संख्येने शेतकरी आंदोलनात बायका-पोरांसह गेले 20 दिवस ठाण मांडून बसले आहेत. कडकडीत ‘हिंदुस्थान बंद’ पाळून जनतेने आंदोलनाला समर्थन दिले आहे. शेतकरी एकटे नाहीत. आंदोलन केवळ एका कोपऱयातले नाही, तर संपूर्ण देशातल्या शेतकऱयांचे असल्याचे यातून दाखवून दिले आहे.’
एकीकडे शेतकऱयांसोबत चर्चा करायची, तर दुसरीकडे वेगवेगळ्या पद्धतीने फूट पाडायचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. शेतकऱयांना पाकिस्तानी, नक्षलवादी, खलिस्तानवादी असे सगळे म्हणून झाले तरी शेतकरी आपल्या मुद्दय़ांवर ठाम असल्याचे शेट्टी म्हणाले.
रावसाहेब दानवेंचे वक्तव्य निषेधार्ह
‘देशाचे नागरी पुरवठा राज्यमंत्री असलेल्या दानवे यांचे खाते शेतकऱयांच्या उत्पादनाशी निगडित आहे. याच मंत्रालयाचा एक माणूस त्याच्या खात्यात अशा चुकीच्या धोरणामुळे शेतकऱयांवर बरा-वाईट परिणाम होत असताना आंदोलनाविषयी चुकीची व बेजबाबदार वक्तव्ये करीत आहे. हे अतिशय निषेधार्ह आहे. कायम अशा प्रकारे शेतकऱयांच्या बाबतीत चुकीची वक्तव्ये करणारे दानवे यांना मत देणाऱया शेतकऱयांनाही आपण योग्य माणसाला मत दिले आहे का?’ असा प्रश्न पडत असावा,’ असेही राजू शेट्टी म्हणाले.































































