
‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय आज निर्णय देणार आहे.
आरोपीचे वकील ऍड. महेश तवले म्हणाले, ‘बोठे याने ‘हनी ट्रप’विषयी वृत्तमालिका लिहिली होती. त्यामध्ये सागर भिंगारदिवे याचा उल्लेख होता. बोठे याने भिंगारदिवे याचा ‘हनी ट्रप’ वृत्तमालिकेतून पर्दाफाश केला होता. त्यामुळे भिंगारदिवे याला बोठे संपर्क का करतील? जरे यांची सुपारी भिंगारदिवेला का देतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भिंगारदिवे याने नाव घेतले म्हणून बोठे यास पोलीस कोठडीची गरज नाही,’ असेही ते म्हणाले.
यावर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता सतीश पाटील यांनी युक्तिवाद केला. पाटील म्हणाले, ‘तपास अधिकाऱयांनी जरे यांच्या घरातून जरे यांनी लिहिलेले एक पत्र हस्तगत केले आहे. त्यामध्ये जरे यांनी बोठे माझा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याचे लिहिले आहे. 24 नोव्हेंबरला करंजी घाटात जरे यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो प्रयत्नही फसला. त्यानंतर 30 नोव्हेंबरला जरे यांची हत्या करण्यात आली.’
24 व 30 नोव्हेंबर रोजी आरोपी बोठे हा सागर भिंगारदिवे, रेखा जरे यांच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड करून स्पष्ट होत आहे. पोलिसांच्या कॉल रेकॉर्डमध्ये हत्याकांडाच्या दिवशी बोठे हा सातत्याने जरे यांना संपर्क साधून त्यांचे ठिकाण कुठे आहे, त्याची माहिती घेत होता. त्यानंतर बोठे याचे सागर भिंगारदिवे याला अनेकदा फोन झाले आहेत. याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यामुळे बोठे याचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

























































