
– वैश्विक, [email protected]
आपल्या सूर्यमालेतील आपले रक्षक असलेले दोन बलाढय़ ग्रह म्हणजे गुरू आणि शनी. या ग्रहांची एक दुर्मिळ युती (कंजन्क्शन) किंवा जवळीक येत्या 21 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. गेला महिनाभर पश्चिमेकडच्या खिडकीतून हे दोन्ही ग्रह सूर्यास्तानंतर नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला पाहण्याचा आनंद मिळतोय. पृथ्वीच्या बराच जवळ आलेला लाल रंगाचा मंगळही आकाशात संध्याकाळी अगदी डोक्यावरच दिसतोय. असे तीन महत्त्वाचे आणि क्रमाने असलेले ग्रह छान दर्शन देतात तेव्हा बरे वाटते. आकाशाच्या अभ्यासकांना त्यांचा वेध घेता येतो. कोरोना काळ नसता तर या ग्रह-दर्शनाचे कार्यक्रमच झाले असते. परंतु सारी पथ्ये पाळून गुरू-शनी युती पाहता आली तर जरूर पाहा.
21 डिसेंबर हा तसाही महत्त्वाचा दिवस. सूर्य सध्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावर तळपत असल्याने आपल्याकडे दिवस लहान आणि रात्र मोठी असा काळ आहे. साहजिकच नोव्हेंबर ते जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत आकाशनिरीक्षकांना संध्याकाळी लवकरच तारांगण उपलब्ध होत असतं. अनेक वर्षं आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. तारकासमूह, राशी, दीर्घिका यांच्यात बदल होत नसतात. ग्रह मात्र आपल्या जवळ आणि आपल्याच सौर-कुटुंबातील सदस्य असल्याने त्यांच्या कक्षेतील गतीचा त्वरित परिणाम आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतो. त्यामुळेच त्यांचे तुलनेने पृथ्वीजवळ येणं, दूर जाणं याचे गणित समजू शकतं. सूर्यमालेतील सहज दिसणारे बुधापासून शनीपर्यंतचे ग्रह नुसत्या डोळय़ांनी न्याहाळता येतात. युरेनस, नेपच्यून तशी दूरची मंडळी. बहुतेक ग्रह सूर्याभोवती फिरताना साधारण समान प्रतलात फिरतात हा योगायोग. त्यामुळे केव्हातरी (गणिती अभ्यासानुसारच) त्यांची युती पाहायला मिळते तर काही वेळा चार-पाच ग्रह एका रेषेत वगैरे दिसतात.
खगोलाच्या अभ्यासाचा विकास झाला नव्हता तोपर्यंत या ग्रहांबद्दलचे बरेच ग्रह लोकांच्या मनात असत. आता आधुनिक माहिती उपलब्ध असल्याने त्यांच्या हालचालींकडे वैज्ञानिक पद्धतीनेही पाहिले जाते. ग्रहांची युती, ग्रहण, बुध, शुक्र यांचे सूर्यबिंबापुढून होणारं अधिक्रमण या घटना आवर्जून न्याहाळल्या जातात. येत्या काही दिवसांत सायंकाळच्या आकाशातील गुरू व शनी जवळ येताना दिसतील आणि 21 तारखेला त्यांच्यामधले आपल्या दृष्टिसापेक्ष अंतर नगण्य असेल. ही एक दुर्मिळ अवकाशस्थ घटना असून बऱयाच काळानंतर इतकी निकट युती होत आहे. एरवी दर एकोणीस वर्षांत या ग्रहांची युती होतच असते पण त्यांच्या अशा विशेष भेटीगाठीचा इतिहास वाचताना 16 जुलै 1623नंतर आताच इतकी अप्रतिम जवळीक दिसत असल्याचे म्हटले जाते.
गुरू आणि शनी हे गेल्या 20 सप्टेंबरपासून हळूहळू जवळ येत असलेले महाकायग्रह आपल्यापासूनच नव्हे तर एकमेकांपासूनही खूप दूर आहेत. गुरूचं पृथ्वीपासूनचं अंतर सुमारे 63 कोटी किलोमीटर आणि शनी आपल्यापासून सुमारे 1 अब्ज 28 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. यावरून त्या दोघांमधल्याही कोटय़वधी किलोमीटर अंतराची कल्पना येईल. परंतु सूर्याभोवती फिरता फिरता समप्रतलामुळे ते क्वचित परस्परांसमोर येतात आणि आपल्याला ते जवळ येत येत एकत्रच असल्याचा भास होतो. 21 डिसेंबरला तसेच घडणार आहे.
गुरू हा नावाप्रमाणेच सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असून त्याच्या उपग्रहांची (चंद्रांची) संख्या शंभराच्या घरात पोचली आहे. त्याच्या वायूरूप पृष्ठभागावरचा रेड स्पॉट म्हणजे वर्षानुवर्ष चालणारे वादळ असून त्यात तीन पृथ्वी सहज मावतील एवढा त्याचा व्यास आहे. गुरूचा बाह्यभाग आणि आतील घट्ट गाभा यांची स्वतःभोवती फिरण्याची गती भिन्न आहे. तीच गोष्ट शनीची. या ग्रहाला अप्रतिम कडी असून ती हजारो किलोमीटर रुंदीची आहेत. कॅसिनी यानाने त्यांचं संपूर्ण निरीक्षण केलंय. गुरू सूर्याभोवती सुमारे बारा वर्षांत तर शनी साडे एकोणतीस वर्षांत एक परिक्रमा पूर्ण करतो. गुरूवरचा दिवस 9 तासांचा तर शनीवरचा 10 तासांचा असतो.
या ग्रहांच्या अस्तित्वाने पृथ्वीरक्षणासाठी नैसर्गिक ढाल निर्माण केल्याने आपला अवकाशात इतस्ततः भटकणाऱया महापाषाण (अशनी) धूमकेतू वगैरेंपासून बचाव होतो. शिवाय, पृथ्वीवर निरभ्र आणि पारदर्शक वातावरण असल्याने अवघ्या ग्रहसृष्टीचा सूर्याभोवतीचा फेर आपण पाहू शकतो.
काही खगोलीय घटना खूपच दुर्मिळ असतात. शुक्राचे अधिक्रमण आता 110 वर्षांनी दिसेल. त्याचप्रमाणे पुढची गुरू -शनी निकटता 2417 मध्ये पाहायला मिळेल. अवघ्या 0.1 अंश अंतरापर्यंत जवळ येणारे हे महाग्रह, मास्क वापरून व सामाजिक अंतराचं भान ठेवून, शक्यतो घराच्या खिडकीतून सायंकाळच्या पश्चिम आकाशात पाहता आले तर एका ऐतिहासिक खगोलीय घटनेचे साक्षीदार होता येईल.



























































