शिक्षण विभागात बदलीचे वारे, प्रभारी अधिकाऱयांच्या जागी कायमस्वरूपी बदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण विभागातील प्रभारी पदांवर आता कायमस्वरूपी बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून शिक्षण विभागातील बदल्या थांबवलेल्या असल्याने बहुतेक पदांवर प्रभारींची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता शिक्षण विभागामध्ये मोठय़ा प्रमाणात बदल्या झाल्या असून पुणे, मुंबई, संभाजीनगर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कायमस्वरूपी उपसंचालक मिळाले आहेत.

संभाजीनगर विभागीय निरीक्षकपद हेसुद्धा प्रभारींच्याच खांद्यावर होते. मात्र बुधवारी केलेल्या बदल्यांमध्ये प्रभारी जबाबदाऱया दूर करत मुंबई विभागीय उपसंचालकपद राज्य शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय सचिव संदीप संगवे यांच्याकडे सोपवली. तर संभाजीनगर विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा कारभार अनिल साबळे, पुणे शिक्षण उपसंचालकपदी औदुंबर उकिरडे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य मंडळाच्या नाशिक विभागीय सचिवपदी राजेंद्र अहिरे, लातूर विभागीय सचिवपदी सुधाकर तेलंग, मुंबई विभागीय सचिवपदी सुभाष बोरसे, पुणे विभागीय सचिवपदी अर्चना कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचा पदभार अनेक वर्षे शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्याकडे होता. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी शिक्षक संघटना व शिक्षकांकडून करण्यात येत होत्या, परंतु भाजप सरकारच्या काळामध्ये शिक्षण विभागामध्ये कोणत्याही बदल्या करण्यात न आल्याने त्यांच्याकडे हे पद कायम राहिले होते. परंतु नुकतेच अहिरे यांच्याकडील पदभार काढून तो उत्तर मुंबई विभागाचे शिक्षक निरीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आला.