
कडी कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि देवघरातील रोख रक्कम असा एकूण एक लाख एक हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत निगडीतील सह्याद्री गड येथील कृष्णा सहकारी सोसायटीत घडली. अंकुश दत्तात्रय माने (वय 38, रा. कृष्णा सहकारी सोसायटी, निगडी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 17) निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार माने यांचे घर 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 ते 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 या कालावधीत बंद होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला आणि घरात शिरले. लोखंडी कपाटातील लॉकर उघडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि हॉलमध्ये असलेल्या देवघरात ठेवलेली रोख रक्कम असा एकूण एक लाख एक हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.





























































