अंबडमध्ये वाळू माफीयांवर धडक कारवाई; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुध्द अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. वाळू माफीयांच्या लोकशेनसाठी तैनात असलेल्या बुलेटसह ट्रॅक्टर व दोन ब्रास वाळू असा एकूण 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाळू माफियांवर झालेल्या कारवाईने वाळू माफीयांचे धाबे दणाणले आहे.

गोदावरी नदीपात्रात सध्या पाणी असतानाही वाळू उपसा करण्यासाठी अनेक अवजारांचा रात्रीच्या वेळी वापर करत वाळू उपसा सुरू होता. अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी रात्रीची पथके स्थापन करून स्वतः लक्ष घालत कारवाई सुरू केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

गोंदी, हसनापूर, कोठाळा येथे पात्रातून ट्रॅक्टर वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार कडवकर यांनी गोदापात्रात गुरुवारी दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत कारवाई करत वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त केले. तसेच लोकशेनसाठी बूलेट दुचाकी जप्त करत वाळू माफीयांविरुध्द धडक कारवाई केली. गोंदी येथील सखाराम रमेश परासे, ज्ञानेश्वर देविदास खरात, अक्षय सुरेश खरात,आसमान ऊर्फ पप्पु नबाजी गात, दयानंद शिवाजी शिंदे, बाबासाहेब विठ्ठल सावंत यांच्यावर अवैध वाळू उपसा प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हसनापूर शिवारात 5 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ज्यात एक ट्रॅक्टर, बुलेट,दोन ट्रॉली,दोन ब्रास वाळू,एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. 11 डिसेंबर रोजी सिद्धेश्वर फाटा गोंदी येथील जप्त केलेले केनीचे महिंद्रा अर्जुन कंपनीचे ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी तलाठी किरण जाधव यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.