
ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढील तीन कसोटींमध्ये कर्णधार विराट कोहली असणार नाही. पहिल्या कसोटीतील पराभवामुळे बॅकफूटवर गेलेल्या हिंदुस्थानी संघाला या मालिकेत 4-0 अशा फरकाने हरवण्याची सुवर्णसंधी ऑस्ट्रेलियाकडे आहे, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने रविवारी व्यक्त केले.
रिकी पाँटिंग पुढे म्हणाला, डेव्हिड वॉर्नर व विल पुकोवस्की हे दुखापतीमधून बरे होतील अशी आशा आहे. दोघेही फिट झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर संघामध्ये खेळेल. पण जो बर्न्सने सलामीवीर म्हणून दुसऱया डावात ठसा उमटवला आहे. त्यामुळे विल पुकोवस्कीला बाहेरच राहावे लागणार आहे. तसेच डेव्हिड वॉर्नरची एण्ट्री झाल्यानंतर पॅमरून ग्रीन आणि मॅथ्यू वेड यांच्यापैकी एकाला संघाबाहेर रहावे लागेल, असे त्याने पुढे नमूद केले.
सिडनीमध्येच होणार तिसरी कसोटी
सिडनीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 7 जानेवारीपासून सुरू होणारा तिसरा कसोटी सामना सिडनी येथे न आयोजित करता ब्रिस्बेन येथे आयोजित करण्यात यावा आणि चौथा सामना ब्रिस्बेनऐवजी सिडनीत खेळवण्यात यावा अशा हालचालींना वेग आला. पण तिसरी कसोटी सिडनीतच होईल अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच दुसरी व तिसरी कसोटी मेलबर्न येथे खेळवण्याचा पर्यायही यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे असणार आहे.


























































