
रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरुवारी पहाटे माळनाका परिसरातील एका इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. सकाळी फिरायला गेलेल्या महिलेने त्यांचा मृतदेह पाहिला आणि एकच खळबळ उडाली.
शहरातील माळनाका येथील तारा ऑर्किड येथे चंद्रकांत पटेल वास्तव्याला होते. कालच ते गुजरात राजकोट येथून रत्नागिरीत आले होते. दोन महिन्यापूर्वी ते आपल्या मूळ गावाला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनावर त्यांनी यशस्वी मात देखील केली. दोन महिने ते घरीच होते. कालच ते आपल्या वडीलांसह रत्नगिरीत परतले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावली आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.





























































