
मुंबईच नव्हे तर देशविदेशातील पर्यटक-नागरिकांसाठी आकर्षण असलेल्या पालिका मुख्यालय इमारतीमध्ये नव्या वर्षात ‘हेरिटेज वॉक’ सुरू होणार असल्यामुळे सध्या स्वच्छता, डागडुजी आणि रंगरंगोटीची लगबग सुरू असून काम अंतिम टप्प्यात आहे. पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून सध्या आवश्यक कार्यवाहीचे काम सुरू करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची गॉथिक शैलीतील इमारत पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे 150 वर्षांच्या या वास्तूची माहिती पर्यटकांनाही जाणून घेता यावी यासाठी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामध्ये करार करण्यात आला आहे. यानुसार जानेवारी 2021 पासून या इमारतीमध्ये पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाकडून आवश्यक पूर्वतयारी वेगाने सुरू आहे. पर्यटकांना ही ‘हेरिटेज वॉक’ खाकी टूर्सच्या माध्यमातून घडवली जाणार आहे. इमारतीच्या गेटपासून, सभागृह, पुतळे, गोल घुमट आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गाइडच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
हॉलिडे, किकेंडला हेरिटेज कॉक
पर्यटकांना ‘हेरिटेज वॉक’ आठवडय़ाच्या शनिवार आणि रविवारी करता येणार आहे. याशिवाय सुट्टीच्या दिवशीही पर्यटकांना ही संधी मिळणार आहे. यासाठी पालिकेच्या सुरक्षा विभागाकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. दरम्यान, मुख्यालय इमारतीच्या सुरक्षेसाठी अलीकडेच 84 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून या उपक्रमाची व्याप्ती वाढवली जाणार आहे.

























































