
झोपडपट्टीबहुल भाग असलेल्या पालिकेच्या एम पूर्व म्हणजेच देवनार, गोवंडी आणि मानखुर्द परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगरपालिका आणि टाटाच्या माध्यमातून कम्युनिटी लीड अॅक्शन, लर्निंग अॅण्ड पार्टनरशिप अर्थात क्लॅप उपक्रम राबवण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आला.
पालिकेच्या क्षेत्रातील एम/पूर्व हा झोपडपट्टीबहुल आणि नियोजन नसलेल्या स्वरूपात विखुरलेल्या वस्तींनी व्यापलेला आहे. या विभागातील नागरिकांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठीच पालिका आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांच्या सहकार्यातून ट्रान्सफॉर्मिंग एम वॉर्ड अभियान हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पात एम/पूर्व विभागामध्ये 24 वस्त्यांमधील सुमारे 60 हजार घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. वस्ती पातळीवर लोक सहभागातून कम्युनिटी केअर सेंटर उभारणे, सामुदायिक प्रयत्नातून स्थानिक पातळीवर शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, जीवनमानाचा आर्थिक स्तर उंचावणे आणि या तीनही बाबींमध्ये संवाद, समन्वय व संपका&चा माध्यम म्हणून आय-कॉल या हेल्पलाइनचा उपयोग करणे अशा 4 बाबी क्लॅप प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत. यातील आय-कॉल उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सल्लागार (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, एम/पूर्व विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र नौनी, टाटा ट्रस्टच्या शिखा श्रीवास्तव, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या डॉ. अपर्णा जोशी, डॉ. नीलेश गावडे उपस्थित होते.
मानसिक ताणतणाव, भीतीच्या समस्याही सोडवणार
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने सन 2012 मध्ये आय-कॉल हेल्पलाइनची संकल्पना राबवायला सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी मुख्यत्वे प्रशिक्षित समुपदेशकांमार्फत मनोवैद्यकीय सल्ले व समुपदेशन यापुरतीच ती मर्यादित होती. एम/पूर्व विभागात आता सुरू झालेली हेल्पलाइन ही अत्यंत व्यापक आहे. संबंधित विभागातील नागरिकांना मानसिक ताणतणाव, भीती अशा मानसिक समस्यातून सोडविण्यासह त्यांना स्थानिक पातळीवरील शिधावाटप, आरोग्य, रोजगार, वैद्यकीय सल्ला व माहिती देणे तसेच निरनिराळ्या शासकीय योजना व उपक्रमांची माहिती देणे हेदेखील यातून साध्य होणार आहे, अशी माहिती टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या डॉ. अपर्णा जोशी यांनी दिली.
कोरोना रुग्ण मिळाल्यामुळे सील करण्यात आलेल्या इमारतींचीही संख्या आता वेगाने घटत आहे. यामध्ये मुंबईत सध्या 2 हजार 739 इमारती, इमारतीचे भाग सील आहेत. यामध्ये बी प्रभाग सँडहर्स्ट रोड – 5, सी मरीन लाइन्स – 7 आणि एम पूर्व देवनार-गोवंडी-मानखुर्दमध्ये केवळ सर्वात कमी 13 इमारती सील आहेत.





























































